कल्याण : डोंबिवली जवळील दावडी गाव हद्दीतून एका सोळा वर्षाच्या तरूणीला अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेले आहे. घरातून बाहेर पडलेल्या या तरूणीचा कुटुंबीयांना शोध घेतला. ती कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय घेत कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ही अल्पवयीन तरूणी डोंबिवली जवळील दावडी गाव हद्दीत आपल्या साठ वर्षाच्या आजी सोबत राहते.
एक साठ वर्षाची आजी आणि तिची १६ वर्षाची नात या दोघी दावडी गावात एका चाळीत राहतात. चार दिवसापूर्वी सकाळी सात वाजता अल्पवयीन तरूणी आपल्या आजीला काहीही न सांगता घराबाहेर पडली. ती काही कामानिमित्त बाहेर गेली असेल. ती परत येईल, असे आजीला वाटले. पण बराच उशीर झाला तरी नात घरी आली नाही म्हणून आजीने दावडी भागात तिचा शोध घेतला. ती आढळून आली नाही.
त्यामुळे सकाळच्या वेळेत बाहेर पडलेल्या आपल्या नातीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेले असावे, असा संशय तिच्या आजीला आला. तिने मानपाडा पोलीस ठाणे गाठले. तेथे नात बेपत्ता झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यापूर्वीही ही अल्पवयीन तरूणी आजीला न सांगता बेपत्ता झाली होती. त्यानंतर ती घरी आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ बनसोड याप्रकरणाचा तपास करत आहेत. डोंबिवली परिसरातील ग्रामीण भागातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.