ठाणे : पडघा येथील राहुरी गावातील आदिवासी जमिनी बळकावून त्यावर उभारण्यात आलेली २३ पैकी १७ बांधकामे भिवंडी तहसीलदारांनी सोमवारी जमीनदोस्त केली. या बांधकामांबाबत श्रमजीवी संघटनेने केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून अतिक्रमणमुक्त झालेल्या जमिनी पुन्हा मुळ आदिवासींच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना रुग्णालयातून घरी सोडले
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा भागात राहुरी गाव आहे. या गावातील भुमीहिन आणि शेतमजूर अशा २३ आदिवासींना शासनाने १९७८ मध्ये जमीनींचे वाटप केले होते. या एकूण जागेचे क्षेत्रफळ ८० एकरच्या आसपास आहे. या जमिनी मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघ्यापासून तीन किलो मीटर अंतरावर असून या जागेमधून कुंभेरी नदी वाहते. आदिवासींच्या अज्ञान, गरिबीचा फायदा घेऊन थोडीफार रक्कम देऊन आणि दहशतीच्या मार्गाने भुमाफियांनी या जमिनी बळकावून त्यांची फसवणुक केली होती. या जागेवर शेतघरे, कुक्कूट पालन, शेळीपालन, राईस मील, निवासी चाळी आणि मत्यशेतीसाठी तलावांची बांधणी करण्यात आली होती. याबाबत १७ आदिवासींनी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडल्या होत्या. यानंतर समितीचे अध्यक्ष पंडीत यांनी गावामध्ये भेट देऊन जागेची प्रत्यक्ष पाहाणी केली होती. हि बाब त्यांनी निदर्शनास आणून देताच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार, भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले यांनी सोमवारी पोलिस बंदोबस्तात येथील १६ बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. यामध्ये शेतघरे, कुक्कूट पालन, शेळीपालन, राईस मील, निवासी चाळींचा समावेश आहे, अशी माहिती श्रमजिवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील बेकायदा इमारत भुईसपाट, ‘फ’ प्रभागाची आक्रमक कारवाई
पडघा येथील राहुरी गावातील आदिवासी जमिनी बळकावून त्यावर बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. ही बेकायदा बांधकामे हटवून १७ आदिवासींना त्यांच्या जमिनींचा ताबा देण्यात आला आहे. उर्वरित ६ आदिवासी जमीन मालकांचा शोध घेऊन त्या जमीनीवरील बांधकामे हटविण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार आहे. अभिजीत खोले- तहसीलदार, भिवंडी तालुका, ठाणे</p>