१६ वर्षांच्या मुलाकडून १९ वर्षीय तरुणीची फसवणूक

एका १६ वर्षीय मुलाने १९ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. वारंवार सुरू असलेल्या अत्याचारामुळे पीडित तरुणी गरोदर राहिली. यामुळे सहा महिन्यांची गरोदर असताना त्या मुलाने आणि त्याच्या २१ वर्षीय भावाने गावी नेऊन तिचा गर्भपात केल्याचाही प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागात इंदिरानगर परिसरात १९ वर्षीय पीडित तरुणी राहते. याच परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाने तिला सहा महिन्यांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे वचन देऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

इंदिरानगर भागातील एका खासगी कंपनीच्या समोर टेम्पो आणि ट्रक उभे करण्यात येतात. या टेम्पो आणि ट्रकमध्ये नेऊन तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. तसेच परिसरातील मोकळ्या जागेतील झुडूपात आणि पार्किंगच्या जागेतील रिक्षांमध्येही नेऊन त्याने  तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

या प्रकारामुळे पीडित तरुणी सहा महिन्यांची गरोदर राहिली. यामुळे त्या मुलाने आणि त्याच्या भावाने तिला खासगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांनी त्यास नकार दिला. यामुळे पिडीत मुलीसह तिच्या आई-वडीलांना गावी नेऊन त्यांनी तिचा गर्भपात केला. त्यानंतर तो गर्भ स्मशानात पुरला.

याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असून या अहवालानंतर त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे; मात्र याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या २१ वर्षांच्या भावाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.