ठाणे : ठाण्यात कंपनीमध्ये गुंतणूकीच्या मोबादल्यात जादा परताव्याचे अमीष दाखवून २०० गुंतवणूकादांची अंदाजे १०० कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

यातील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते मुंबईतील भांडूप येथील रहिवासी आहेत. त्यांची ओळख एका अर्थपुरवठा करणाऱ्या दलालासोबत होती. तो दलाल आणि त्याचे सहकारी मिळून गुंतणूकदारांचे पैसे घेऊन ते वेगवेगळ्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगामध्ये गुंतवणूक करण्यासाठी देत असे. त्या मोबदल्यात गुंतवणूकदारांना मोबदला मिळत राहील अशी बतावणी त्यांनी तक्रारदारांना केली.

ही कंपनी ठाण्यातील नौपाडा भागात होती. तक्रारदार यांनी २०१६ मध्ये आठ लाख रुपयांची गुंतवणूक केली. दोन वर्ष त्यांना गुंतवणूकीवर दरमहा १.५ टक्के व्याज परतावा मिळत होता. परंतु त्यानंतर व्याज येणे बंद झाले. याबाबत तक्रारदार यांनी दलालांना विचारले असता, त्यांनी कंपनीची आर्थिक स्थिती वाईट असल्याचे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली.

नौपाडा येथे कंपनीमध्ये तक्रारदार हे वांरवार गुंतवणूकीबाबत विचारणा करण्यासाठी येत होते. त्यावेळी या कंपनीमध्ये आणखी काही जणांची अशाचप्रकारे फसवणूक झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता २०० गुंतवणूकदारांची अंदाजे १०० कोटी रुपयांना फसवणूक झाल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी ठाणे पोलिसांकडे तक्रारी अर्ज केला होता. या तक्रारीनंतर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.