डोंबिवली : डोंबिवलीतील एका २३ वर्षाच्या गिर्यारोहकाने आफ्रिका खंडातील टांझानिया प्रांतामधील किलीमांजारो या १९ हजार ३४० फूट सर्वोच्च उंचीच्या शिखरावर गिर्यारोहण करण्याचा मान मिळविला आहे. ८५ किलोमीटर उभ्या चढीचे हे सर्वोच्च शिखर आहे. या शिखरावर गिर्यारोहण करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून गिर्यारोहक आर्यन अजित शिरवळकर हे सराव करत होते.
मागील आठवड्यात आठ दिवसाच्या कालावधीत आर्यन शिरवळकर यांनी आपल्या दोन मार्गदर्शकांच्या साहाय्याने हे गिर्यारोहण यशस्वी केले. स्वखर्चाने आपण हा गिर्यारोहणाचा उपक्रम केला. गिर्यारोहण क्षेत्रातील फूटप्रिंट ॲडव्हेंचर्स संस्थेचे आर्यन शिरवळकर हे सहसंस्थापक आहेत. शाळकरी विद्यार्थी, नागरिक, विविध स्तरातील हौशी गिर्यारोहक यांना निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवणे, गिर्यारोहण घडवून आणण्याचे काम ही गिर्यारोहण संस्था करते.
आर्यन यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीतील उंबार्ली येथील विद्यानिकेतन शाळेत झाले. माॅडेल महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य अभ्यासक्रम पूर्ण केला. वडील अजित, आई निता, मोठे बंधू यांच्यापासून आर्यन यांना क्रीडा, गिर्यारोहण विषयक बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षापासून आर्यन लहान, मोठ्या गिर्यारोहण उपक्रमांमध्ये सहभागी होत होता. त्यावेळेपासून त्याला गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. गिर्यारोहण क्षेत्रातील ज्येष्ठ नंदू चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. या क्षेत्रातच जीवनाची वाटचाल करण्याचा निर्णय आर्यन यांनी घेतला. गिर्यारोहण क्षेत्रातील विविध प्रकारचे एकूण तेरा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले. नोंदणीकृत गिर्यारोहण संस्थांकडे नोंदणी करून आर्यन फूटप्रिंट ॲडव्हेंचर्सच्या माध्यमातून गिर्यारोहण मोहिमा ते आखत आहेत. आतापर्यंत ४०० हून अधिक गिर्यारोहण मोहिमांचे नेतृत्व आर्यन यांनी केले आहे. यामध्ये हिमालयातील मोहिमांचा समावेश आहे.
जगातील सात खंडांमधील प्रत्येक सर्वोच्च शिखरावर गिर्यारोहण करण्याचा आर्यन यांचा मानस आहे. व्यक्तिगत जिवनातही गिर्यारोहण क्षेत्रात आपले वेगळे स्थान असावे म्हणून आव्हानात्मक, धाडसी गिर्यारोहण मोहिमा करण्याचे नियोजन आर्यन यांनी केले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आर्यन यांनी आफ्रिका खंडातील टांझानिया येथील किलीमांजारो शिखर मोहीम केली. या मोहिमेसाठी त्यांनी मागील सहा महिने खडतर सराव केला.
विविध प्रकारच्या मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये आर्यन यांचे कुटुंब भाग घेते. तो अनुभवही त्यांना गिर्यारोहणासाठी कामी आला. गेल्या आठवड्यात स्थानिक मार्गदर्शकांच्या साहाय्याने टांझानिया येथील किलीमांजारो शिखरावर अंधाऱ्या रात्रीत विजेऱ्यांच्या मदतीने चढण्यास सुरूवात केली. वेगवान वारा, कधी निरभ्र आकाश, तर कधी ढगाळ वातावरण, कडाक्याची थंडी यावेळी होती. आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत सहाव्या दिवशी सकाळी शिखरावर पोहचलो. तेथे भारताचा तिरंगा झेंडा फडकविला. त्यानंतर दोन दिवसात परतीचा प्रवास पूर्ण केला, असे आर्यन यांनी सांगितले.
जीवनाची वाटचाल गिर्यारोहण क्षेत्रात करण्याचे निश्चित केले आहे. निसर्ग संवर्धनाचे महत्व समाजाला पटवून देणे. हा मुख्य उद्देश आहे. समाजाला गिर्यारोहण घडवून आणताना स्वतासाठी गिर्यारोहण क्षेत्रात काही आव्हानात्मक करण्याचे निश्चित केले आहे. त्यामधून आफ्रिका खंडातील ही शिखर मोहीम यशस्वी केली. प्रत्येक खंडातील सर्वाेच्च शिखरावर पोहचण्याचा मानस आहे. आर्यन शिरवळकर गिर्यारोहक, डोंबिवली.