आमदार रामनाथ मोते यांची माहिती
कल्याण डोंबिवलीजवळील २७ गावे ही पालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे या गावांमधील प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने ३० टक्के घरभाडे भत्ता देण्यात यावा, असे आदेश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाण्याच्या वेतन अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिली.
गेल्या वर्षी मार्चमध्ये २७ गावे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी शासनाने या गावांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३० टक्के घरभाडे भत्ता देण्यात यावा, असा आदेश काढला होता. या आदेशाची अंमलजबावणी जिल्हा, पालिका स्तरावरील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत नव्हती. शासनस्तरावरून घरभाडे भत्ता देण्याबाबत वेगळा आदेश येत नाही, तोपर्यंत तो देता येणार नाही, अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभाग, वेतन विभाग, पालिकेकडून शिक्षकांना देण्यात येत होती. या प्रकरणी २७ गावांमधील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी आमदार रामनाथ मोते, शिक्षक संघटनेचे अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
वर्ष उलटून गेले तरी २७ गावांमधील शिक्षकांना ३० टक्के घरभाडे भत्ता देण्यात येत नाही, अशी माहिती आमदार मोते, बोरनारे यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन दिली. यावेळी मंत्र्यांनी तात्काळ ठाणे येथील वेतन अधीक्षकांना संपर्क करून २७ गावच्या शिक्षकांना घरभाडे भत्ता देण्यासाठी वेगळ्या परिपत्रकाची आवश्यकता नाही. तातडीने त्यांना घरभाडे भत्ता लागू करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे अधीक्षकांनी सर्व शाळांना मे महिन्याची वेतने देयके घरभाडे भत्ता आकारून काढण्याचे आदेश दिले आहेत, असे अनिल बोरनारे यांनी सांगितले.