वसईतील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
सुमारे २० लाखांहून अधिक लोकसंख्येची शहरे बनलेल्या वसई-विरारमधील वाहतूक नियंत्रणाचा भार अवघ्या ४३ पोलिसांच्या खांद्यावर आहे. सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले असतानाच अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक कोंडी सोडवणे पोलिसांच्या आवाक्याबाहेरचे ठरू लागले आहे. त्यातच बेकायदा रिक्षांची वाहतूक आणि रस्त्यांवरील अतिक्रमण यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
वसई-विरार शहर पूर्वी ठाणे जिल्ह्यात होते. त्यापूर्वी जिल्हा विभाजनापूर्वी वसई वाहतूक विभागाकडे ७४ वाहतूक पोलीस होते. ठाण्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या वेळी अधिक मनुष्यबळ मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु पोलीस वाढण्याऐवजी आहेत त्यातील संख्या कमी झाली. वसईत वाहतूक विभागातले निम्म्याहून अधिक वाहतूक पोलीस ठाणे जिल्ह्यात पाठविण्यात आले, तर विविध कारणांमुळे सहा वाहतूक पोलीस निलंबित झाले आहेत. त्यामुळे आता वसई वाहतूक विभागाकडे केवळ ४३ पोलीस कार्यरत आहेत. या विभागात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक आणि ४३ पोलीस कर्मचारी असे कर्मचारी तैनात असतात. त्यांना वसई, नालासोपारा, विरार ही तीन शहरे आणि परिसरातील गावे, महामार्ग असा भाग सांभाळावा लागतो. वसई रोड येथे वाहतूक पोलिसांचे मुख्य कार्यालय आहे.
वसई वाहतूक पोलिसांकडे ४३ पोलीस कर्मचारी असले तरी रस्त्यावर दररोज फक्त २२ ते २५ वाहतूक पोलीस हजर राहू शकतात. कारण साप्ताहिक रजा, न्यायालयीन कामे, कार्यालयीन कामे, वैयक्तिक रजा यामुळे उर्वरित पोलीस उपलब्ध नसतात. वसई आणि नालासोपारामधील उड्डाणपूल शहराच्या मध्यवर्ती भागात असून तेथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ६ पोलीस तेथे तैनात करावे लागतात. उर्वरित पोलिसांना शहरातील वाहतुकीचे नियमन करावे लागते. विशेष म्हणजे विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे एकच जुनाट जीप आहे. इतर वाहतूक पोलिसांकडे सरकारी मोटारसायकली नाहीत. त्यामुळे त्यांना खासगी मोटारसायकली वापरण्याशिवाय पर्याय नाही.
प्रभावी वाहतूक नियंत्रण होत नसल्यामुळे बेकायदा रिक्षांचे प्रमाण शहरात वाढत आहे. याशिवाय अवैध प्रवासी वाहतूकही मोठय़ा प्रमाणात होत आहे. एकदिशा मार्गाचा अभाव, अधिकृत वाहनतळे नाहीत, रस्त्यांचे नियोजन नाही अशा अनेक गोष्टींमुळे वसई-विरारमधील वाहनचालकांना शहरातून ये-जा करणे म्हणजे अडथळय़ांची शर्यत असल्यासारखे बनले आहे

‘मनुष्यबळवाढीचा प्रस्ताव’
आमच्याकडे मनुष्यबळ कमी असले तरी आम्ही उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबरअखेपर्यंत आम्ही पाच हजारांहून अधिक गुन्हे दाखल करून पावणेसात कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक पोलिसांना वाहने मिळावीत तसेच मनुष्यबळ वाढवून मिळावे, असा प्रस्ताव आम्ही पाठविला असून लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे.
– रणजीत पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई वाहतूक विभाग