ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळपर्यंत कायम होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शहरातील विविध भागांत एकूण ४४ वृक्ष तर ६ फांद्या उन्मळून पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या पावसामुळे विविध ठिकाणी भिंत पडणे, पाणी साचणे, वृक्ष कोसळणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये एका ठिकाणी वृज्ञ वाहनावर पडल्याने वाहनाचे नुकसान झाले. तर, एका घटनेत सुके वृक्ष पडून दोन जण जखमी झाल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच सोमवार आणि मंगळवारी पावसाचा जोर वाढल्याचे चित्र होते. त्याचा फटका अनेक शहरांना बसला. पावसाचा अंदाज पाहून शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. बुधवारी सकाळी देखील पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले, तर नदी-नाले ओसंडून वाहू लागले होते.
या मुसळधार पावसामुळे मंगळवार रात्रीपासून ते बुधवार दुपारपर्यंत अनेक भागात जीर्ण झालेली एकुण ४४ वृक्ष तर, ०६ फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये ठाण्यातील तुळशीधाम हाईड पार्क येथे सुकलेले वृक्ष मंगळवारी रात्री पडले, त्यात वसंतविहार मधील हर्षद सुरेश लाड (३३) आणि उपवन, कोकणीपाडा येथील नागेश दादाराव सूर्यवंशी (३६) हे दोघे जखमी झाले आहेत. तसेच बुधवारी सकाळच्या सुमारास ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक ०२ येथील वसंत विहार परिसरात असलेल्या केतकी सोसायटी जवळ उभ्या केलेल्या वाहनावर वृक्ष कोसळले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले. वागळे इस्टेट येथील रामचंद्र नगर नंबर १ या भागातील लाभेश सोसायटीच्या आवारामधील वृक्ष बुधवारी मध्यरात्री सोसायटीच्या सुरक्षा भिंतीवर कोसळले. यामुळे ३० फूट लांब आणि ०८ फूट उंचीची सुरक्षा भिंत बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या परवानगीने बाजूला करण्यात आली.
त्याचप्रमाणे शहरातील पातलीपाडा, ब्रह्मांड, रामचंद्र नगर, वसंत विहार या भागात देखील वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेत, पडलेली वृक्ष कापून एका बाजूला केली. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील बचाव पथकांना विशेष सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील गरज असल्यास तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.