तानसा, वैतरणा धरणांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज
पालघर जिल्ह्यातील तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा धरण ओसांडून वाहू लागले असून या धरणांचे दरवाजे मंगळवारी रात्री उघडण्यात आले आहेत. त्याचा फटका धरण परिसरातील आणि नदीकिनाऱ्यावरील ४५ गावांना बसणार असून, त्यात वसई तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. पूरस्थिती नियंत्रणात राहावी आणि त्याचा जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी आपत्कालीन यंत्रणाही सज्ज झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील धरणांच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे धरणांचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहापूर तालुक्यात तानता, वैतरणा आणि मध्य वैतरणा ही तीन धरणे आहेत. सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर पाहता ही धरणे आणखी भरतील त्यामुळेच धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तानसा आणि वैतरणा धरणाच्या लगत असलेल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्य़ातल्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे दोन वाजता तानसा धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला. या दोन धरणांचे दरवाजे उघडल्यास वसईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्य़ातील एकूण ३२ गावांना धोका पोहोचू शकणार आहे.
मध्य वैतरणा धरणाने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास २७९.९५ मी पातळी गाठली आहे. हे धरण भरून वाहण्याची शक्यता असल्याने मध्य वैतरणाचे दरवाजेही उघडले जाणार आहेत. यामुळे या धरणाच्या परिसरातील तसेच नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील १३ गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस आणि धरणांमधून सोडण्यात येणारे अतिरिक्त पाणी यामुळे या गावांमधील ग्रामस्थ भयभित झाले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास जायचे कुठे असा प्रश्न दुर्गम भागांतील ग्रामस्थांना पडला आहे.
महापालिकेनेच मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या कुठलेही गाव पूरबाधित झालेले नाही, परंतु आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून सर्व तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना गावात थांबण्यास सांगण्यात आले आहे. ग्रामस्थांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. जीवरक्षक, अग्निशमन दलाचे जवान, बोटी आदींची व्यवस्था किनारपट्टीवरील गावांमध्ये करण्यात आलेली आहे.
– स्मिता गुरव, नायब तहसीलदार, वसई.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 45 villages of vasai face flood risk due to tansa vaitarna dam overflow
First published on: 03-08-2016 at 02:32 IST