कल्याण मधील एका नोकरदाराला मोठ्या पदावरील नोकरीचे आमिष दाखवून भामट्यांनी त्यांची ऑनलाईन माध्यमातून मुलाखत घेतली. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्याने पदस्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि पाठविलेली एक जुळणी नोकरदाराला उघडण्यास सांगून त्या माध्यमातून नोकरदाराच्या वेगळ्या बँक खात्यामधून एकूण चार लाख नऊ हजार ६४९ रुपये स्वताच्या खात्यांवर वर्ग करुन फसवणूक केली आहे.

महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोकरदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. योगेश नारायण चेऊलकर (४५, रा. न्यू रिध्दी सिध्दी पार्क, छत्री बंगल्या जवळ, कल्याण पश्चिम) असे तक्रारदार यांचे नाव आहे. विशाल शर्मा, कृष्णा रामाराव अशी आरोपींची नावे आहेत. जुलै २०२१ मध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी सांगितले, १५ जुलै २०२१ ते २७ जुलै २०२१ या कालावधीत आरोपी विशाल शर्मा, कृष्णा रामाराव यांनी फिर्यादी योगेश चेऊलकर यांना मोबाईलवरुन संपर्क केला. आम्ही जॉब्स लाईव्ह डॉट कॉममधून बोलतो. विविध कंपन्यांमध्ये असलेल्या नोकऱ्या, तेथील मुलाखतींची कामे आम्ही बाह्यस्त्रोत यंत्रणेतून करतो. असे योगशे यांना सांगितले. या बोलण्यावर योगेश यांनी विश्वास ठेवला. योगेश यांना भामट्यांनी वरिष्ठ व्यवस्थापक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखविले. या पदासाठी भामट्यांनी योगेश यांची कॉग्नीजन्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीच्या तीन भामट्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मुलाखत घेतली. या मुलाखतीत योगेश पास झाल्याचे सांगण्यात आले. या नोंदणी प्रक्रियेसाठी योगेश यांच्याकडून साडे सहा हजार रुपये भामट्यांनी उकळले. त्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक पदाची पदस्थापना देण्यासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी करावी लागेल यासाठी १८ हजार ९०० रुपये उकळण्यात आले. त्यानंतर एक जुळणी भामट्यांनी योगेश यांना पाठविली. ती जुळणी योगेश यांनी उघडताच भामट्यांनी योगेश यांच्या एचडीएफसी बँक अंधेरी शाखा, कल्याण मधील संतोषी माता रोड शाखा आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सात व्यवहार करुन योगेश यांच्या बँक खात्या मधून खोटी कारणे देऊन चार लाख नऊ हजार ६९४ रुपये परस्पर वळते करुन भामट्यांनी योगेश चेऊलकर यांची फसवणूक केली.
योगेशनी यांनी भामट्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद नाहीच पण बँकेतील रक्कम वर्ग करुन घेण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे योगेश यांच्या निदर्शनास आले. त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. माहिती तंत्रज्ञान खात्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसापूर्वीच पलावा येथील एका नोकरदाराची अशाच पध्दतीने कंपनीच्या उपाध्यक्ष पदासाठी नोकरी लावतो असे सांगून पाच लाखाची फसवणूक भामट्यांनी केली आहे. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ऑनलाईन व्यवहार, नोकरी विषयक माहिती घेताना सत्यता तपासून नागरिकांनी व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.