कल्याण- कल्याण मधील जुन्या ज्येष्ठ निष्ठावान सुमारे ५०० हून अधिक शिवसैनिकांनी सोमवारी मुंबईत मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. बाहेर कितीही गटातटाचे राजकारण असले तरी आम्ही निष्ठावान शिवसैनिक म्हणून तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही पक्षप्रमुखांना दिली.
शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याची शपथपत्रे आणि सुमारे सात हजार नवीन शिवसैनिकांची नोंदणी केली असल्याची माहिती कल्याण शिवसेना शहरप्रमुख सचिन बासरे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिली. शपथपत्र पक्षप्रमुखांच्या स्वाधीन करण्यात आली. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर कल्याण, डोंबिवली मध्ये अनेक शिवसैनिकांची कोंडी झाली. जुने निष्ठावान शिवसैनिक आम्ही शिवसेनाप्रमुखांची शिवसैनिक म्हणून पक्षप्रमुख ठाकरे यांच्या बरोबरच राहणार अशी ठाम भूमिका घेऊन होते.
गेल्या दोन महिन्याच्या काळात या शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांनी भेट घेण्याची इच्छा शहरप्रमुख सचिन बासरे यांच्याकडे व्यक्त केली होती. या शिवसैनिकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी सकाळी कल्याण मधील जुने निष्ठावान शिवसैनिक खासगी वाहनाने मुंबईत गेले. या शिवसैनिकांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मातोश्री आवारात झुंबड नको म्हणून गटागटाने भेटले, अशी माहिती शहरप्रमुख सचिन बासरे यांनी दिली.
ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास, रवींद्र उल्लारे, श्रीधर खिस्मतराव, रवींद्र कपोते, विजया पोटे, सुरेश सोनार यांच्यासह ५०० शिवसैनिक मातोश्रीवर गेले होते. या सर्व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे असल्याचे सांगितले, अशी माहिती शहरप्रमुख बासरे यांनी दिली. या भेटीने कल्याण पश्चिमेतील शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे संदेश शिवसैनिकांनी शिंदे गटाला दिला असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.