ठाणे : गेल्याकाही वर्षांमध्ये ऑनलाईनरित्या सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणूकीचे प्रकार मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. डिजीटल अटक, शेअर बाजारात पैसे गुंतविल्याचे भासवून फसवणूक करणे अशा विविध माध्यमातून सायबर गुन्हेगार नागरिकांचे पैसे अवघ्या काही सेकंदात त्यांच्या बँक खात्यातून काढून घेत आहेत.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी ठाणे पोलिसांनी ७२ सायबर योद्ध्यांची नियुक्ती केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात या सायबर योद्ध्यांची नेमणूक केली जाणार असून हे योद्धे सायबर सुरक्षितता, कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) प्रशिक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इंटरनेटच्या जगात समाजमाध्यम, ऑनलाईन व्यवहारांचा वापर वाढल्यानंतर आता याच माध्यमांचा गैरवापर करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या देखील कार्यरत झाल्या आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात शेकडो नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक झालेल्या तक्रारी देखील पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा बहाणा करुन जादा परताव्याचे अमीष दाखविणे, वृद्धांना ऑनलाईन संपर्क साधून त्यांना अटकेची भिती घालणे (डिजीटल अटक), सिमा शुल्क विभागात वस्तू आल्याचे सांगून त्यानंतर ते अमली पदार्थ असल्याचे भासविणे अशा प्रकाराच्या फसवणूकीचा वापर सायबर गुन्हेगार अधिक प्रमाणात करतात.
ठाणे पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात सायबर कक्ष स्थापन केले आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे देखील सुरु केले आहे. सायबर गुन्हेगार परराज्यात बसून हा प्रकार करत असल्याने त्यांचा शोध घेणे अनेकदा कठीण होत असते. पोलीस प्रकरणांचा तपास करत असताना त्यांना तांत्रिकदृष्ट्या अनेक अडचणींचा सामना सहन करावा लागतो. त्यामुळे ठाणे पोलिसांनी आता ठाण्यातील डिकोडटेक इंडस्ट्रियल प्रा. लि. या कंपनीसोबत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यात तांत्रिक तपासात मदत करण्यासाठी सायबर योद्ध्यांची नेमणूक केली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात चार असे एकूण १५० सायबर योद्ध्यांच्या नेमणूकीची मंजूरी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली असून त्यापैकी ७२ योद्ध्यांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी प्रशिक्षण तत्त्वावर करण्यात आली आहे. या सर्व योद्ध्यांना डिकोडटेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रा. लि. या कंपनीने प्रशिक्षीत केले असून सायबर सुरक्षा, एआय आणि डिजीटल फाॅरेन्सिक याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.