ठाणे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था अपुरी;  महिला प्रवाशांना सर्वाधिक त्रास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सात लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. परंतु या स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या ७७ रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांवर आहे. त्यातही या ठिकाणी तैनात जवानांची संख्या ६७ असून रात्री आठनंतर हे कर्मचारीही स्थानकात नसतात, अशा तक्रारी आहेत. सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचा गैरफायदा गर्दुल्ले, मद्यपी व भिकाऱ्यांनी घेतला असून महिला प्रवाशांशी गैरवर्तन करण्याचे प्रकार त्यामुळेच वाढत आहेत.

रात्रीच्या वेळी सुरक्षा दलाचे जवान स्थानकात नसल्याचा महिला प्रवाशांना अनुभव असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क करूनही कोणतीही मदत मिळत नसल्याने महिलावर्गात दहशतीचे वातावरण आहे. ठाणे स्थानकातील फलाटांची संख्या दहा असून दरदिवशी या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सरासरी संख्या सात लाखांहून अधिक आहे. प्रवाशांच्या संख्येच्या प्रमाणात येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त वाढविणे आवश्यक आहे. मात्र ठाण्यातील महेंद्र मोने यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीनुसार संपूर्ण स्थानकासाठी सुरक्षा यंत्रणांचे मनुष्यबळ ७७ इतकेच आहे. स्थानकात एक निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, ६ साहाय्यक उपनिरीक्षक, २४ प्रधान आरक्षक आणि ४३ आरक्षक इतके मनुष्यबळ असल्याची कबुली रेल्वे सुरक्षा बलाकडून देण्यात आली आहे.

सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याने ठाणे स्थानकात प्रवाशांशी विशेषत: महिलांशी असभ्य वर्तन करण्याचे प्रकार वाढत आहेत.  महिलांना शिवीगाळ करणे, अश्लील हावभाव करणे, रेल्वेच्या साहित्याची तोडफोड करणे, कचराकुंडय़ा भिरकावणे, रुळांवर उतरून धिंगाणा करून रेल्वेगाडय़ा अडविणे आदी प्रकार गर्दुल्ले  करीत असतात, अशी तक्रार काही महिला प्रवाशांनी केली आहे.

या संबधी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा अधिकारी सचिन भालोदे यांना विचारणा केली असता, बऱ्याचदा कळवा, मुंब्रा किंवा पारसिक बोगदा या ठिकाणी आपात्कालीन परिस्थिती उद्भवत असते, त्यामुळे येथील कर्मचारी त्या ठिकाणी पाठविण्यात येत असतात. गरजेनुसार कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 77 guards for 7 million passengers on thane railway station
First published on: 26-07-2017 at 03:08 IST