मूलभूत सुविधांच्या अभावामुळे निर्णय
ठाणे : ठाणे येथील पोखरण भागातील औद्योगिक परिसरात शौचालय आणि पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी सातत्याने महापालिकेकडे करूनही मान्य होत नसल्यामुळे संतापलेल्या ८०० उद्योजकांनी कुटुंबासह विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आचारसंहिता संपल्यानंतर या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेवर ‘टमरेल मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ठाण्यातील पोखरण येथील पोखरण लेक लघु उद्योजक संघटनेतर्फे मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. संघटनेच्या ८०० उद्योजकांनी त्यांच्या कुटुंबासह जिल्ह्य़ातील १८ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. १४ ते १५ हजार मतदारांचा बहिष्कारामध्ये सहभाग असेल असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पोखरण येथील ५० एकर परिसरात सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत. यावर ४ ते ५ हजारांचा कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे.
शौचालयाचीही समस्या
या ठिकाणी यापूर्वी एकच सार्वजनिक शौचालय होते. मात्र रस्ता रुंदीकरणात जानेवारी २०१८मध्ये कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता ते तोडण्यात आले. अद्याप या ठिकाणी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. येथील गाळे हे लहान असल्याने उद्योजकांना कामाच्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करता येत नाही. या परिसरात ड्रेनेज वाहिनीची देखील व्यवस्था नाही.
सुविधांसाठी ५ कोटींची तरतूद पण..
ठाणे महापालिका पायाभूत सुविधाकरिता विविध कर स्वरूपात महसूल गोळा करते परंतु सुविधा मात्र पुरवत नसल्याने याबाबत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता असे पोखरण येथील उद्योजकांनी सांगितले. या परिसरातील उद्योगाच्या अडचणी समजून घेऊन जानेवारी २०१६ रोजी येथील मूलभूत सुविधांकरिता आयुक्तांनी ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. तसेच याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला संघटनेशी संपर्कात राहून काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून सुविधांच्या कोणत्याही कामाची पूर्तता झाली नसून संघटनेला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.