नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर होणार दंडात्मक कारवाई

ठाणे शहरातील नाल्यांसोबतच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या प्रमुख गटारांची सफाई करण्याचा निर्णय घेऊन या कामाच्या निविदा पालिका प्रशासनाने काढल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्याचे नियोजन करत ही सर्व कामे पावसाळ्यापुर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत उरकण्याचे लक्ष्य पालिकेने ठरविले आहे. विशेष म्हणजे, यंदा नालेसफाईच्या कामांचे चित्रीकरण, छायाचित्र काढण्याबरोबरच ड्रोनचाही वापर केला जाणार असून ड्रोनद्वारे नालेसफाईआधी आणि सफाईनंतरच्या कामांचे चित्रीकरण केले जाणार आहे. त्यात नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदारावर प्रत्येक ठिकाणानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यामुळे यंदा ठाण्यातील नालेसफाईवर ड्रोनची नजर राहणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या; करमुसे प्रकरणात झाली होती अटक

ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्य नाले आणि त्यास जोडणारी लहान-मोठे नाले असे एकुण ३०० किमी लांबीचे नाले आहेत. शहरात एकूण ३२५ नाले आहेत. त्यातील १३ मोठ्या नाल्यांना उर्वरित ३१२ नाले जोडण्यात आलेले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यापुर्वी नालेसफाईची कामे करण्यात येतात. असे असली तरी पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारांची सफाई करण्यात येत नसल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून परिसर जलमय होण्याचे प्रकार घडत आहेत. या नाल्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत होते. या भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर पालिकेच्या कारभारावर टिका होत होती. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका घनकचरा विभागाने यंदा नालेसफाई सोबतच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या प्रमुख गटारांची सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वेगळा निधी खर्च करण्यात येणार नसून ही कामे नालेसफाईच्या कामाच्या खर्चातूनच करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही सर्व कामे पावसाळ्यापुर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत उरकण्याचे लक्ष्य पालिकेने ठरविले असून त्याचबरोबर या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई बडगा उगारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने नऊ प्रभाग समिती स्तरावर नालेसफाईच्या कामांसाठी निविदा काढल्या असून या कामांसाठी ९ कोटी ९६ लाख ९७ हजार ९४२ रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. त्यातील १ कोटी ५० लाख ९२ हजार रुपये वस्तु व सेवा कराचे तर ७ लाख ५५ हजार रुपये विम्याचे आहेत. त्यामुळे नालेसफाईच्या कामांवर प्रत्यक्षात ८ कोटी ३८ लाख ४८ हजार रुपये खर्च होणार आहेत. ही कामे करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन या मशिनचा वापर करून नाल्यातील गाळ काढण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळेत पथदिवे चालू होत नसल्याने कल्याण-डोंबिवलीत नागरिकांचा अंधारातून प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नालेसफाईच्या कामांचे चित्रीकरण, छायाचित्र काढण्याबरोबरच ड्रोनचाही वापर केला जाणार असून ड्रोनद्वारे नालेसफाईआधी आणि सफाईनंतरच्या कामांचे चित्रीकरण केले जाणार आहे. त्यात ज्या भागांमध्ये नालेसफाई योग्यप्रकारे झाली नसल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जितके भागात नालेसफाई झालेली नाही, त्या प्रत्येक भागांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आकरला जाणार आहे. शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचते. पण, ठेकेदाराच्या चुकीमुळे पाणी तुंबल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर २५ हजार दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.