अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील आनंद नगर अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका औषध निर्मिती कंपनीला रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीत असलेले रसायने यांच्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. कंपनीतून काही रसायने बाहेर वाहून आल्याने शेजारच्या दोन कंपन्यांनाही आगीची झळ बसली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या वतीने सुरू होते.

हेही वाचा >>> समाजमाध्यमांत पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाचे वारे..

रेसिनो ड्रग प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. रात्री साडे नऊच्या सुमारास रसायनामुळे आग लागल्याने कंपनीने पेट घेतला. याची माहिती मिळताच अग्निशमन दानाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. कंपनीतून रसायने बाहेर वाहून येत असल्याने शेजारच्या कंपन्यांनाही आगीची झळ बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच कंपनी बाहेरच्या नाल्यामध्ये रसायन पसरल्याने येथेही काही काळ भडका उडाला होता. त्यामुळे येथे गोंधळाची स्थिती होती. रात्री अकरा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले नव्हते. कंपनीत कर्मचारी अडकल्याची किंवा कोणत्याही जीवितहानीची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. मात्र भीषण आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.