मित्रासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने मित्राच्या मदतीने घरातून ५३ हजार रुपयांचे दागिने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. तसेच हे प्रकरण उघड पडू नये म्हणून अश्लिल छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करेल अशी धमकी एकजण देत असल्याचा बनावही रचला होता. अखेर पोलिसांच्या सखोल चौकशीतून मुलगी आणि तिच्या एका मित्राचे हे कारस्थान समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिचा मित्र आलोक राऊत (१८) आणि सराफा व्यवसायिक बासुकी वर्मा (३२) या दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा- ठाण्यात शिंदे गटाविरोधातील फलकबाजी प्रकरणी तीन जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई

घोडबंदर येथील आझादनगर भागात मुलगी राहते. सुमारे आठवड्याभरापूर्वी ती तिच्या आई-वडिलांसोबत कापूरबावडी पोलीस ठाण्यात आली होती. एका मित्राने तिचे अश्लिल छायाचित्र काढले असून ते छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करणार असल्याची धमकी तो देत आहे. तसेच ते टाळण्यासाठी त्याने तिच्याकडून पैसे मागितले होते. त्यामुळे घरातील दागिने चोरी करून ते त्यास दिल्याची माहिती त्या मुलीने पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरू केला. मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने दागिने ब्रम्हांड येथील एका सराफाला विकल्याचे सांगितले. पोलीस त्या अल्पवयीन मुलाला घेऊन सराफाच्या दुकानात गेले असता, सराफाने हा मुलगा दुकानातच आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता तो मुलगा त्या दुकानात आला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा मुलगा बनाव करत असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा- ठाणे जिल्ह्याचा बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, शुक्रवार बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पोलिसांनी मुलीची सखोल चौकशी केली असता, तिने मित्र आलोक राऊत याला याप्रकरणातून वाचविण्यासाठी हा बनाव केल्याचे कबूल केले. तसेच ३ जानेवारीला आलोक आणि तिचा वाढदिवस असतो. तो वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने हे दागिने चोरी केल्याची कबूली दिली. या घटनेनंतर पोलिसांनी आलोक राऊत याला अटक केली. तसेच त्यांनी हे दागिने चितळसर मानपाडा येथील सराफा व्यापारी बासुकी वर्मा याला विकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी विक्री केलेले दागिने जप्त करून वर्मा यालाही अटक केली. तर मुलीला अल्पवयीन बालिका म्हणून ताब्यात घेऊन बाल न्यायालयाकडे पाठविण्याची तजवीज ठेवली आहे, असे पोलिसांनी सांगितले.