ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात फलाटावर येत असलेल्या लोकलमधील एका प्रवाशाच्या हातातील मोबाईल चोरट्याने खेचला आणि यामुळे प्रवासी तोल जाऊन खाली पडल्याने त्याला डावा हात खांद्यापासून गमवावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. या घटनेच्या निमित्ताने लोकलच्या दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांच्या हातातील किंमती ऐवज लुटणारी फटका गँग पुन्हा कार्यरत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

शशिकांत कुमार (२२) असे डावा हात गमावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर, गणेश शिंदे (२९) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घटनेमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईतील घणसोली भागात शशिकांत कुमार हे राहतात. रविवारी ते वांगणी येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. तेथून ते रात्रीच्या वेळेस लोकल गाडीने घरी परतत होते. लोकलगाडीच्या दरवाजात उभे राहून ते प्रवास करित होते. लोकलगाडी रात्री ११.५५ मिनिटांनी दिवा स्थानकात आली असता, त्यावेळी दिवा स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या गणेश शिंदे याने त्यांच्या हातावर जोरदार फटका मारून मोबाईल खेचला. यामुळे ते तोल जाऊन खाली पडले. या घटनेनंतर इतर प्रवाशांनी तत्काळ गणेश शिंदे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा – डोंबिवलीतील वसंत हेरिटेज बेकायदा इमारतीच्या कराची कागदपत्रे सादर करा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कडोंमपाला आदेश

हेही वाचा – ठाणे : शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या घरात चोरी, ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फलाट आणि लोकलगाडीच्यामधील जागेत पडल्याने शशिकांत यांचा डावा हात लोकलखाली येऊन तो खांद्यापासून तुटला. प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने जखमी झालेले शशिकांत यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गणेशला अटक केली आहे.