कल्याण – छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जत लोकलने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा लोकलमध्ये मृत्यू झाला होता. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याचा मृतदेह उतरुन पालिका रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या मृत प्रवाशाच्या शर्टावर असलेल्या शिंप्याच्या नामपट्टीवरून ओळख पटवून तो मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.

गेल्या आठवड्यात एक प्रवासी कर्जत लोकलने छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून कर्जतच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासात त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याचा लोकलमध्येच मृत्यू झाला. प्रवाशांनी त्याला डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरुन लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याचा मृतदेह कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला होता. मृत प्रवाशाजवळ त्याच्या ओळखीची कोणतीही खूण नव्हती. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांना मृताच्या नातेवाईकांना शोध घेताना अडचणी येत होत्या.

हेही वाचा – कल्याण : शिळफाटा रस्त्यावरील दिवसाची अवजड वाहतूक बंद करा, आमदार प्रमोद पाटील यांची मागणी

प्रवाशाच्या शर्टवर फॅशन टेलर, वांगणी वेस्ट अशी नामपट्टी होती. प्रवासी कर्जत जवळील वांगणी परिसरातील असावा असा विचार करून वरिष्ठ निरीक्षक दुसाने यांनी वांगणीमध्ये फॅशन टेलर नावाचा शिंपी आहे का याचा शोध हवालदारांना घेण्यास सांगितले. फॅशन टेलरचा तपास लागल्यानंतर त्याला प्रवाशाची छबी पाठविण्या आली. त्याने हा प्रवासी वांगणीमध्ये लक्ष्मी सोसायटीत राहत असल्याचे पोलिसांना सांगितले. मृत व्यक्तीचा शर्ट आपणच शिवून दिला असल्याचे पोलिसांना सांगितले. या व्यक्तिचे नाव मेहबूब नासिर शेख (५७) असे असल्याचे शिंप्याने सांगितले.

हेही वाचा – ठाण्यात राजकीय वरदहस्त व मर्जीतील अपंगच लाभार्थी? अखिल भारतीय दिव्यांग सेनेचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंपी आणि डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी महेबूब यांचे घर गाठले. त्यांच्या कुटुंबियांना कल्याणमध्ये पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात मृताची ओळख करण्यासाठी येण्यास सांगितले. महेबूब यांच्या पत्नीने पतीला ओळखले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मेहबूब यांचा मृतदेह कुुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने, पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. के. पिंगळे. के. टी. पाटील यांनी या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.