कल्याण – येथील म्हारळ गाव हद्दीतील खदानीत मंगळवारी रात्री दारू पित असताना चार मित्रांनी आपल्या एका मित्राला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून हत्या केली. मारेकऱ्यांपैकी दोन जणांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. दोन जण फरार आहेत. दोन आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. दोन जणांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजन शाम येरकर उर्फ जानू असे मयत तरूणाचे नाव आहे. तो म्हारळ गावातील सूर्यानगर भागात राहतो. मंगळवारी रात्री मयत राजन आणि त्याचे चार मित्र रोहित भालेकर, परवेझ शेख, सुनील वाघमारे, समीर चव्हाण म्हारळ गावा जवळील दगड खदानीत दारू पित बसले होते. दारू पित असताना राजन आणि इतर चार यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. भांडण वाढत गेले. इतर मित्रांनी एकत्र येऊन राजनला बेदम मारहाण केली.

परवेझ जवळील रिव्हॉल्वर घेऊन रोहितने दोन गोळ्या हवेत झाडल्या. तिसरी गोळी राजनच्या डोक्यात शिरली. तो जागीच मरण पावला. ही माहिती राजनच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी राजनला उल्हासनगरच्या सेंट्रल रूग्णालयात नेले. तेथे त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.

हेही वाचा : शरद मोहोळ खून प्रकरण : ‘या’ कारणामुळे अटकेत असलेल्या वकिलाकडून सरकारी वकिलाला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भालेकर, वाघमारे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरूद्ध कल्याण रेल्वे पोलीस, कोळसेवाडी, विष्णुनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी चार आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दोन जण अटकेत आहेत. दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे तपास करत आहेत.