बदलापूरः गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात  तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ठाणे जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यांचा अनुभव येतो आहे. या वाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्री ताशी ७२ किलोमीटरचा वेग नोंदवला. बदलापुरातील खासगी हवामान अभ्यासकांनी रात्री बाराच्या सुमारास ही नोंद केली. तर गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ५० ते ६० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात असंख्य झाडांची पडझड झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध भागात सोसाट्याच्या वारा अनुभवता येतो आहे. बदलापूर,  अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, कल्याण या तालुक्यांमध्ये सुमारे ५० ते ६० प्रति किलोमीटर वाऱ्याची नोंद अनेक खासगी हवामान अभ्यासकांनी केली. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा एकमेकांना घासून विजपुरवठा खंडीत झाल्याच्याही अनेक घटना समोर आल्या. ठाणे जिल्हा समुद्रापासून जवळ असल्याने या वाऱ्यांची तीव्रता येथे जाणवत असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. अरबी समुद्रात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा आणि दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वारे वेगवान झाले. परिणामी ते जिल्ह्यातूनही वाहत असल्याची  माहिती कोकण हवामानचे खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. याच सोसाट्याच्या वाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्री विक्रम नोंदवला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून ताशी ५० ते ६०  किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मात्र गुरूवारी रात्री बाराच्या सुमारास बदलापुरच्या खासगी हवामान केंद्रात ताशी ७२ किलोमीटर वाऱ्याच्या वेगाची नोंद झाली. रात्री १२ वाजून ७ मिनीटांनी ७२.४  किलोमीटर प्रतितास वाऱ्याची नोंद झाली. नैऋत्य दिशेने हे वारे वाहत होते, अशी माहिती अभिजीत मोडक यांनी दिली आहे. एरवी पावसाळ्यात ताशी ५० ते ६० किलोमीटर  प्रतितास  वाऱ्याचा वेग असतो. मात्र गुरूवारी ७२ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे वादळाचा भास होत असल्याचेही मोडक यांनी सांगितले.