डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर भागात राहणारी २२ वर्षाची एक नेल आर्टिस्ट (नखे सौंदर्यीकरण) आपल्या मित्रासह डोंबिवली ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर मित्राच्या मोटारीतून गेल्या आठवड्यात संध्याकाळी चहा पिण्यासाठी गेली होती. एका चहा ठेल्याच्या बाजुला मोटार उभी करून दोघेही चहा पिण्यासाठी गेले. तेथून परतल्यावर मोटारीची मागील काच फोडून चोरट्याने मोटारातील महिला नेल आर्टिस्टचा पैशांचा बटवा चोरट्याने चोरून नेला.
पैशाच्या बटव्यामध्ये १८ हजार रूपये किमतीच्या नोटा, एअर बर्ड, मोबाईल चार्जर आणि घराच्या चाव्या होत्या. ही नेल आर्टिस्ट आपल्या आई वडिलांसह सुनीलनगर मधील ध. ना. चौधरी विद्यालय परिसरात राहते. गेल्या आठवड्यात ही नेल आर्टिस्ट आपल्या मित्रासह त्याच्या मोटारीतून संध्याकाळी साडे सात वाजता ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर चहा पिण्यासाठी गेली होती. कल्याण डोंबिवली मार्गिकेवरील ९० फुटी रस्त्यावर मित्राने आपले वाहन एका महाराजा दुकानाच्या बाजुला उभे केले. वाहनाच्या काचा, दरवाजे व्यवस्थित बंद करण्यात आले होते. दोघेही एका चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी गेले.
एक तासानंतर नेल आर्टिस्ट आणि तिचा मित्र आपल्या मोटारीच्या ठिकाणी घरी जाण्यासाठी आले. तेव्हा त्यांना मोटारीची मागील भागाची काच फोडली असल्याचे दिसले. फुटलेल्या काचा रस्त्यावर वाहनाच्या बाजुला पडल्या होत्या. मित्राने वाहन उघडून पाहिले तर चोरट्याने दगडाने मोटारीच्या मागील भागाची काच फोडली होती. वाहनात फुटलेल्या काचा पडल्या होत्या. मोटारीच्या मागच्या आसनावर ठेवलेली नेल आर्टिस्टचा पैशांचा बटवा वाहनात नव्हता. त्यामुळे चोरट्याने तो चोरीला नेला असावा असा संशय दोघांनी घेतला.
नेल आर्टिस्ट आणि तिच्या मित्राने आजुबाजुच्या दुकानांमध्ये काच कोणी फोडली म्हणून विचारणा केली. पण कोणीही काही सांगितले नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने पाळत ठेऊन ही चोरी केली आहे, असा संशय व्यक्त करून नेल आर्टिस्टने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
९० फुटी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला दुचाकी, मोटारी उभ्या केल्या की त्या चोरून नेणे, मोटारीच्या काचा फोडून त्यामधील वस्तू चोरून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. ठराविक चोर या भागात फिरत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली, चोळेगाव भागात झोपडपट्ट्या आहेत. चोरी करून चोरट्यांना या परिसरात पळून जाण्याची आणि लपून बसण्याची चांगली सुविधा आहे.