डोंबिवली : डोंबिवलीतील पाथर्ली येथील गायकवाड वाडी मध्ये एका सावत्र आईने आपल्या तीन वर्षाच्या सावत्र मुलाला जीवे ठार मारल्याचा प्रकार पोलीस तपासात उघडकीला आला आहे. या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला आहे.अंतीमादेवी संजय जैस्वाल (२८, रा. सिताबाई निवास इमारत, खोली क्र. १०, पहिला माळा, गायकवाड वाडी, पाथर्ली गाव, डोंबिवली पूर्व) असे आरोपी महिलेचे नाव आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बाकले यांनी याप्रकरणी आरोपी अंतीमादेवी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पाथर्लीगाव गायकवाडी येथे राहणारा कार्तिक (तीन वर्ष) याला गुरुवारी मारहाण झाल्याने त्याला वैद्यकीय उपचारा करिता डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्याच्या वडिलांनी दाखल केले होते. कार्तिकवर मारहाणीच्या वेदनादायी जखमा होत्या. रुग्णालय प्रशासनाला या मारहाणी बद्दल संशय आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. कार्तिकवर शास्त्रीनगर रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधेसह उपचार होत नसल्याने त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात गुरुवारी दाखल केले. तेथे त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा : अभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी कार्तिकच्या मृत्युची चौकशी सुरू केली. त्याला मारहाण कोणी का केली याची सखोल चौकशी करताना पोलिसांना कार्तिक हा अंतीमादेवी जैयस्वाल हिचा सावत्र मुलगा होता. ती त्याचा सतत व्देष करत होती. त्याला नियमित मारहाण करत होती. असे पोलीस तपासात निष्पन्न झाले.गुरुवारी दुपारी अंतीमादेवीने घरात कोणी नाही पाहून तीन वर्षाच्या कार्तिकला आपल्या राहत्या घरात लाथाबुक्क्यांनी, हाताने आणि घरातील तारेच्या तुकडयाने झोडपून काढले. या मारहाणीत कार्तिक गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे अंतीमादेवीने हिने कार्तिकला जीवे ठार मारल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सरडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.