बदलापूरः एका ऍपच्या माध्यमातून पैसे गुंतवल्यास दोन महिन्यात पैसे दुप्पट करून मिळतील, असे अमिष दाखवून बदलापूर शहरात एका महिलेची ३४ लाख ५३ हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. आदिती दास या महिलेने तक्रारदार महिलेला फोन करून ऍपची लिंक पाठवून ते डाऊनलोड करत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तक्रारदार महिलेने ऍप डाऊनलोड करून त्याद्वारे गुंतवणू केली होती. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सुरूवातीला समाज माध्यम खात्यांवर काही कार्य करण्याच्या नावाखाली पैसे मिळण्याचे अमिष दाखवून लुबाडले जात होते. त्यानंतर शेअर बाजारात गुंतवणुकीची अमिषे दाखवली जाऊ लागली. ऑनलाईन ऍप, संकेतस्थळांच्या माध्यमातून पैसे गुंतवण्याचे आवाहन केले जात फसवणूक केली जात होती. यात पोलिसांनीही अशा अविश्वासार्ह माध्यमातून आणि अशक्य मोबदल्याचे अमिष दाखवणाऱ्या योजनांना बळी न पडण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही फसवणुकीचे प्रकार थांबलेले नाहीत.
बदलापुरात असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. १० जून २०२५ रोजी पासून १४ जुलै २०२५ पर्यंत आरोपी आदिती दास हिने तिचा मोबाईल क्रमांकावरून तक्रारदार महिला आणि तिचे पती यांना संपर्क करत तुम्ही युबीएस ट्रेडींग कंपनीत पैसे गुतंवल्यास दोन महिन्यात दुप्पट करून देते, असे अमिष दाखवले. त्यानंतर आरोपी महिलेने तक्रारदार महिलेला लिंक पाठवुन युबीएस नावाचे ऍप डाउनलोड करण्यास सांगीतले. तसेच आरोपी महिलेने वेळोवेळी, वेगवेगळया तारखेला तीने दिलेल्या बँक खात्यात, युपीआय आयडीवर आरटीजीएस, फोन पे करून एकूण ३० लाख ५३ हजार १ रूपये फिर्यादीने पाठवले.
त्यानंतर युबीएस ऍपमधून फिर्यादीने पैसे काढण्याची ( विड्रॉल ) मागणी केली असता आरोपी महिलेने कर म्हणून फिर्यादीकडुन ४ लाख ९९८ रूपये घेतले. त्यानंतर तक्रार महिलेचे युबीएस खाते आरोपी आदिती दास हिने बंद केले. त्यामुळे फिर्यादीची ३४ लाख ५३ हजार ९९९ रूपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादी महिलेने याबाबत सायबर गुन्हे शाखेच्या संकेतस्थळावर तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.