डोंबिवली– दारुच्या मेजवानीमध्ये सहभागी एका तरुणाने आपल्याच सहकारी मित्राची चाकुचे वार करुन निर्घृण हत्या केली. गंभीर जखमी तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रविवारी रात्री शिळफाटा रस्त्यावरील पिसवली टाटा नाका भागात ही घटना घडली. मानपाडा पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

शैलेश शिलवंत (२८) असे मयत रुणाचे नाव आहे. किरण शिंदे (२५) असे अटक आरोपीचे नाव आहे. शैलेश आणि किरण दोघे मित्र आहेत.
पाऊस सुरू झाल्याने आणि रविवारचा दिवस असल्याने शैलेश आणि किरण यांनी दारुची मेजवानी करण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री ते टाटा नाका जवळील पिसवली येथे दारु पिण्यासाठी एकत्र बसले. दारू पित असताना शैलेश आणि किरणमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले. भांडण इतके वाढले की किरणने जवळील चाकुने शैलेशवर सपासप वार केले.

हेही वाचा >>>आधीच पाऊस आणि त्यात बिघाडाचा खोळंबा! बदलापूरजवळ मालगाडीचं इंजिन बिघडल्याने लोकल सेवेवर परिणाम

गंभीर जखमी झालेल्या शैलेशने जीव वाचविण्यासाठी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. काही अंतरावर तो पडला. तसाच उठून तो जवळील खासगी रुग्णालयात गेला. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी दिली.शैलेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आरोपी किरण याला पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.