ठाणे : दिवा रेल्वे स्थानक येथील रेल्वे फाटक ओलांडताना एका २५ वर्षीय मुलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे. लीना दुर्गगवळी (२५) असे या तरुणीचे नाव असून या अपघाताची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी या रेल्वे फाटकात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा अपघात घडल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीत रात्रीचे प्रदूषण वाढले; नागरिकांच्या तक्रारी, नाल्यात रसायन ओतणाऱ्यांविरुध्द गुन्हा

हेही वाचा >>> बनावट शेतकरी दाखला प्रकरणाच्या तपासासाठी तक्रारदाराची वरिष्ठांकडे तक्रार; ठाणेनगर पोलिस अडचणीत येण्याची चिन्हे

दिवा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ९० टक्के नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वेकडून पश्चिमेकडे येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वीच रेल्वे फाटकालगत पादचारी पूल उभारला आहे. या पूलावर सकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे बहुतेक प्रवासी दिवा स्थानकाजवळील रेल्वे फाटक ओलांडून ये-जा करत असतात. फाटक ओलांडत असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास निळजे गावात राहणारी लीना दुर्गगवळी ही देखील दिवा रेल्वे फाटक ओलांडत होती. त्यावेळी एका रेल्वेगाडीची तिला धडक बसली. या धडकेत तिचा मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. मंगळवारी या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, जून महिन्यात अशाच प्रकारे रेल्वे फाटक ओलांडत असताना दोनजणांचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली होती. अपघातांचे सत्र सुरुच असल्याने फाटकाजवळील उड्डाणपूलाचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young woman died while crossing the diva railway gate accident ysh
First published on: 19-10-2022 at 17:57 IST