भाजपच्या मागणीनंतर शिवसेनेची नमती भूमिका; आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन

ठाणे : पदपथांवर जाहिरात फलक तसेच इतर बांधकामे करण्यास उच्च न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही भाजपच्या नगरसेवकांनी शहरातील पदपथांवर बेकायदा एलईडी फलक (स्क्रीन) उभारल्याचा आरोप करत त्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. या आरोपानंतर एलईडी स्क्रीनबरोबरच शहरातील पदपथांवर उभारण्यात आलेली वाचनालये आणि बेंचवर कारवाई करण्याचा आग्रह धरत भाजपने सर्वपक्षीय नगरसेवकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अखेर सत्ताधारी शिवसेनेने नमती भूमिका घेत एलईडी स्क्रीनबाबत आयुक्तांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील पदपथांवर तसेच चौकात भाजपच्या नगरसेवकांनी एलईडी स्क्रीन उभारल्या आहेत. या स्क्रीनच्या माध्यमातून नगरसेवक स्वत:ची जाहिरातबाजी करीत आहेत. या स्क्रीनचा वीजपुरवठा महापालिकेने खंडित केला आहे. हा वीजपुरवठा खंडित करण्यामागचे कारण स्पष्ट करण्याची तसेच स्क्रीनचा वीजपुरवठा पूवर्वत करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी बुधवारच्या सर्वसाधारण सभेत केली. त्यास काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आक्षेप घेत शहरात उभारलेले एलईडी स्क्रीन बेकायदा असल्याचा आरोप केला. शहरातील पदपथांवर जाहिरात फलक तसेच इतर बांधकामे करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. असा आदेश असतानाही पदपथांवर एलईडी स्क्रीन उभारण्यात आले असून या बेकायदा स्क्रीनवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. एलईडी स्क्रीनवर पालिकेचा निधी खर्च करण्याऐवजी प्रभागातील शौचालये, गटार-पायवाटा तसेच इतर महत्त्वाच्या कामांसाठी निधी खर्च करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावरून भाजपचे नगरसेवक आणि काँग्रेसचे नगरसेवक यांच्यात खडाजंगी झाली.

शहरातील काही नगरसेवकांकडून कुटुंबीयांचे फोटो लावून जाहिरातबाजी केली जाते. पदपथावर वाचनालय उभारले जाते आणि बेंच बसविले जातात. वर्षांनुवर्षे हा प्रकार सुरू असून ते इतके दिवस चालत होते. पण भाजपच्या नगरसेवकांनी स्क्रीन उभारली तर त्याला विरोध होत आहे, असे भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करायची असेल तर त्यासाठी तयार आहोत, असे सांगत एलईडी स्क्रीनबरोबरच पदपथांवर उभारण्यात आलेली वाचनालये आणि बेंचवर कारवाई करण्याचा आग्रह नगरसेवक वाघुले यांनी धरला. या मागणीमुळे सर्वच पक्षीयांची कोंडी झाली.

वादावर पडदा

भाजपच्या मागणीमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची कोंडी झाल्याचे लक्षात येताच महापौर नरेश म्हस्के यांनी एलईडी स्क्रीनबाबत आयुक्तांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्याची भूमिका जाहीर केली. एलईडी स्क्रीनचा वीजपुरवठा किती वेळ सुरू ठेवायचा याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे.