मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर मार्ग, मुंब्रा बाह््यवळण, बाळकूम-साकेत मार्गावर वाहतूक कोंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील लाल किल्ला ढाबा परिसरात गुरुवारी पहाटे कंटेनर उलटल्याने त्याचा परिणाम ठाणे, मुंब्रा, भिवंडी शहरातील वाहतुकीवर झाला. हा कंटेनर बाजूला काढण्यासाठी सहा तास लागले. त्याचा परिणाम मुंब्रा बाह््यवळण मार्गासह, मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली ते माजीवडा, बाळकूम-साकेत मार्ग आणि घोडबंदर मार्गावरील माजीवडा ते मानपाडा येथील वाहतुकीवर झाला. ठाणे, मुंब्रा, भिवंडी शहरातून जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना त्याचा फटका बसला. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी वाहनचालकांना दोन ते अडीच तास लागत होते.

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहनकोंडी हळूहळू कमी होऊ लागली. तरीही दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील वाहतुकीवर परिणाम जाणवत होता. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ  आले होते. दहा तासांहून अधिक काळ वाहनकोंडी झाल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. भिवंडी, गुजरातहून उरण जेएनपीटीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा आहे. हजारो अवजड वाहने या मार्गावरून ये-जा करत असतात. नवी मुंबई, शिळफाट्याच्या दिशेने ये-जा करणाऱ्या खासगी वाहनांची संख्या या मार्गावर मोठी असते. हा मार्ग अरुंद असल्याने एखादा अपघात घडल्यास त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेला बसत असतो. गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एक कंटेनर मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून उरणच्या दिशेने जात होता. हा कंटेनर लाल किल्ला ढाबा परिसरात आला असता चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर उलटला. भर रस्त्यात हा कंटेनर उलटल्याने ठाण्याहून उरण जेएनपीटीच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावर, मुंब्रा रोड, मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी येथील रांजनोली ते ठाण्यातील माजीवडा, घोडबंदर मार्गावरील माजीवडा ते मानपाडा आणि बाळकूम-साकेत मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रांजनोली ते माजीवडा या दोन्ही दिशेकडील मार्गावरील वाहने कोंडीत अडकली होती. करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेगाड्यांमधून ठरावीक वेळेशिवाय इतर वेळेमध्ये प्रवास करण्यास अद्यापही बंदी आहे. त्यामुळे भिवंडी, कल्याणमध्ये राहणारे अनेकजण त्यांच्या खासगी वाहनाने मुंबई, ठाण्याच्या दिशेने कामानिमित्ताने येत असतात, तर ठाण्याहून नवी मुंबई आणि भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूकही मोठी असते. ऐन सकाळी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. अर्ध्या तासाच्या अंतरासाठी वाहनचालकांना दोन ते अडीच तास लागत होते.

प्रवाशांचे हाल

सकाळी १० वाजेच्या सुमारास नवी मुंबईहून आलेल्या हायड्रा आणि अवजड वाहनाच्या मदतीने कंटेनर बाजूला करण्यात आला. त्यानंतर दीड तासाने म्हणजेच, सकाळी ११.३०च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. मात्र, दुपारी १२ नंतर पुन्हा अवजड वाहतूक सुरू झाल्याने मुंब्रा बाह्यवळण मार्ग, खारेगाव टोलनाका, काल्हेर-बाळकूम मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी दोन वाजेनंतरही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर या कोंडीचा परिणाम जाणवत होता. ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसगाड्या उपलब्ध नसल्याने एसटी प्रवाशांचेही यामुळे हाल झाले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident in thane traffic problem mumbai nashik highway akp
First published on: 26-02-2021 at 00:14 IST