उल्हासनगरमधील घनश्याम भतिजा यांच्या खुनात श्याम किशोर गारिकापट्टी याचा सहभाग असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे श्यामला जामीन देण्यात येऊ नये, अशी जोरदार मागणी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी कल्याण न्यायालयात केली.

पंचवीस वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोगस मतदान करताना भाजपचे कार्यकर्ते इंदर आणि घनश्याम भतिजा या दोघा बंधूंनी उल्हासनगरचा तत्कालीन नेता व कुप्रसिद्ध पप्पू कलानीला पकडले होते. त्याचा राग पप्पूच्या मनात होता. त्यामुळे पप्पू व त्याच्या सहा ते सात साथीदारांनी कट रचून भतिजा बंधूंचा खून केला होता. इंदर भतिजा खून प्रकरणात पप्पूसह त्याच्या तीन साथीदारांचा प्रत्यक्ष सहभाग सिद्ध होऊन तीन वर्षांपूर्वी त्यांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. हे चौघे सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी श्याम गारिकापट्टी हाही अटकेत होता. तो २००४ मध्ये जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. गोवा येथे शस्त्रास्त्र कायद्याने पोलिसांनी गेल्या दहा महिन्यांपूर्वी अटक केली. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

घनश्याम भतिजा खून खटल्याची कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी सुरू झाल्यानंतर श्यामने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. इतके वर्षे श्यामने जामिनासाठी का अर्ज केला नाही, असा प्रश्न उपस्थित करून सरकारी वकील विकास पाटील यांनी श्यामविरुद्ध सरकार पक्षाकडे घनश्याम याच्या खुनासंदर्भातले सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांच्याकडे केली.

गारिकापट्टी हा मूळचा पुण्याचा रहिवासी आहे. वीस वर्षे तो संघटित टोळीशी संबंधित असल्याचा मुद्दा सरकारी वकिलांनी मांडला. जामिनावर सुटल्यानंतर तो फरार झाला. मागील आठ वर्षे गोव्यातील सलीगाव (पणजी) येथे वेगळे नाव धारण करून तो राहत होता. मुंबई परिसरातील डी गँगकडून चालणाऱ्या सर्व गुन्ह्य़ांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग सिद्ध झाला आहे, असे अ‍ॅड्. पाटील यांनी सांगितले.