कल्याण – टिटवाळा येथील गणेशवाडी भागात सरकारी, काही खासगी जमिनींवर भूमाफियांनी ५० हून अधिक बेकायदा चाळी बांधण्यासाठी जोते बांधले होते. याशिवाय काही ठिकाणी खोल्या उभारणीची कामे सुरू करण्यात आली होती. या बेकायदा बांधकामांची माहिती मिळताच अ प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने ही सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. याशिवाय टिटवाळा गणेश मंदिर ते रेल्वे स्थानक रस्त्यावर काही स्थानिकांनी निवारे बांधून तेथे वाहन दुरुस्ती, भाजीपाला विक्री, इतर व्यवसाय सुरू केले होते. या निवाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा येण्यास सुरुवात झाली होती. अशाप्रकारचे १० हून अधिक निवारे अ प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने जमीनदोस्त केले.

अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्या नियंत्रणाखाली तोडकाम पथकाने गणेशवाडी भागात सरकारी जमिनीवर बांधलेले ५० हून अधिक जोत्याची बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकली. तीन ते चार चाळी उभारणीची कामे वेगाने सुरू होती. ही चाळीची बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. कारवाई पथक घटनास्थळी येताच बांधकाम करणारे गवंडी, कामगार पळून गेले. कारवाई सुरू झाल्यावर एकही भूमाफिया कारवाईला विरोध करण्यासाठी पुढे आला नाही. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १२८ कोटींची ४९ हजार प्रकरणे निकाली

हेही वाचा – राज ठाकरे ९ मार्चला ठाण्यात; ‘संघर्षाची तयारी, पुन्हा एकदा भरारी’ म्हणत मनसेचा गडकरी रंगायतन येथे वर्धापनदिन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिटवाळा परिसरात मोकळे डोंगर, माळरान असल्याने तेथील जागेवर ही बेकायदा बांधकामे केली जात आहेत. अशा बांधकामांवर नजर ठेऊन ती उभी राहण्यापूर्वीच जमीनदोस्त करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे, एकावेळी आम्ही ५० हून अधिक जोती तोडून टाकू शकलो. या चाळीत रहिवासी राहण्यास आले की कारवाई करताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे, बांधकाम नजरेत आले की तात्काळ त्याच्याकडे बांधकाम मंजुरीची कागदपत्रे मागवून ती बांधकामे जमीनदोस्त केली जात आहेत, असे अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी सांगितले. टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणेश मंदिरदरम्यान एकही अनधिकृत निवारा उभा राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, असे वाघचौरे म्हणाले. याशिवाय दैनंदिन फेरीवाले हटविण्याची कारवाई सुरूच आहे, असे ते म्हणाले.