कल्याण – टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ, रस्ते अडवून फेरीवाले, व्यापाऱ्यांकडून उभारण्यात आलेले निवारे, टपऱ्या, हातगाड्यांचा आडोसा घेऊन तयार करण्यात आलेले बेकायदा वाहनतळ, फेरीवाल्यांचे ठेले अशा एकूण ८० हून अधिक बेकायदा अतिक्रमणे, बांधकामांवर बुधवारी, गुरूवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने कारवाई केली. मागील अनेक वर्षानंतर प्रथमच ही कारवाई होऊन टिटवाळा रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमण मुक्त केल्याने रहिवासी, प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

मागील अनेक वर्षापासून टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले, अतिक्रमणे, हातगाड्या, व्यापाऱ्यांनी दुकानासमोर उभारलेल्या निवाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई केली जात नव्हती. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसर विविध प्रकारच्या अतिक्रमणांनी गजबजून गेला होता. टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी टिटवाळा रेल्वे स्थानक ते महागणपती मंदिर दरम्यानचा रस्ता भाविकांनी गजबजून गेलेला असतो. या भाविकांनाही टिटवाळा रेल्वे स्थानक भागातील गजबजाटाचा त्रास होत होता.

टिटवाळा परिसरातील बेकायदा चाळींची हजारो बांधकामे जमीनदोस्त करून टिटवाळा परिसर सुस्थितीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्याकडे टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांच्या वाढत्या तक्रारी आल्या होत्या. बुधवारी, गुरूवारी सकाळी साहाय्यक आयुक्त पाटील, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम, वाहतूक विभागाचे अधिकारी आणि पालिकेचे तोडकाम पथक यांच्या साहाय्याने टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर तोडकाम पथकाने अचानक कारवाई सुरू केली. जेसीबीच्या साहाय्याने निवारे जमीनदोस्त केले. फेरीवाल्यांचे ठेले, हातगाड्या, टपऱ्या घणांच्या घावाने जागीच नष्ट करण्यात आल्या.

टिटवाळा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाजपेयी चौक, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसर आणि निमकर नाका भागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनेक वर्षानंतर प्रथमच टिटवाळा रेल्वे स्थानक परिसराची गजबजाटापासून मुक्तता झाली आहे, अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिल्या. यापूर्वी अशी कारवाई सुरू झाली की काही स्थानिक राजकीय मंडळी, काही लोकप्रतिनिधी पालिका साहाय्यक आयुक्तांना संपर्क करून कारवाईत अडथळा आणत होती, असे समजते.

टिटवाळा रेल्वे स्थानक भागातील अतिक्रमणांवर यापूर्वी कारवाई झाली नव्हती. या भागातील पदपथ, रस्ते, कोपरे फेरीवाले, विक्रेत्यांनी अडवून ठेवले होते. व्यापाऱ्यांनी निवारे उभारून पाचदाऱ्यांचा मार्ग अडविला होता. अशी एकूण ८० हून अधिक अतिक्रमणे दोन दिवसात जमीदोस्त करण्यात आली. पुन्हा अतिक्रमणे केली तर फौजदारी कारवाईचा इशारा व्यापारी, विक्रेत्यांना दिला आहे. – प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक वर्ष टिटवाळा रेल्वे स्थानकातून नोकरीसाठी मुंंबईत जातो. या रेल्वे स्थानकालगतचे फेरीवाले, व्यापारी, रिक्षा वाहनतळांनी अडविलेली जागा, भाजी, फळविक्रेत्यांनी अडविलेल्या जागांमुळे या भागातून चालणे अवघड होते. पालिकेने कारवाई करून हा परिसर मोकळा केल्याने गुदमरलेला हा भाग आता मोकळा झाला आहे. पालिकेने याठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत याची काळजी घ्यावी.- रूपेश काठे, प्रवासी.