Thane ghodbandar Road condition: ठाणे आणि मुंबई परिसरात पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील मोठी अडचण ठरत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे, खचलेले रस्ते आणि वाढलेली वाहतूक कोंडी यामुळे लोकांचा प्रवास धोकादायक ठरत आहे. मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबरच समाजभानही जपताना दिसतात. आजूबाजूच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर ते बिनधास्त आणि बेधडकपणे आपली मते व्यक्त करताना दिसतात. रोजच्या दैनंदिन आयुष्यातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आणि समस्यांबद्दलही ते आवाज उठवताना दिसतात.
असाच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर निर्भीडपणे व्यक्त होणारा, प्रश्न विचारणारा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्ताद हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याची कामाबद्दलची माहिती शेअर करतोच. याशिवाय तो अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही आपली स्पष्ट मतं व्यक्त करत असतो. अभिनेता काळे यांनी सध्या समाज माध्यमांवर एक महत्त्वपूर्ण व्हिडीओ शेअर करून नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या व्हिडीओ आस्ताद काळे म्हणाला आहे की, “गेल्या दोन दिवसांत मी माझ्या प्रवासादरम्यान रस्त्यांची जी अवस्था पाहिली, तिचे व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केले. याला अनेकांनी छान प्रतिसाद दिला. अनेक लोकांनी अशाच अडचणी आपल्या परिसरात कशा प्रकारे भोगाव्या लागत आहेत, हे कॉमेंटमधून सांगितले,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे असेही आवाहन केले की, “जर तुमच्या परिसरातही अशा समस्या असतील, रस्त्यांवर खड्डे असतील तर त्याचे व्हिडीओ पोस्ट करा. मला टॅग करा, मी त्यात सहकार्य करायला तयार आहे. आपण सगळे मिळून हा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचवू शकतो.”
मात्र, आस्ताद काळे यांनी यासोबत एक महत्त्वाचा मुद्दाही मांडला, “संताप व्यक्त करताना आपण भाषा सभ्य ठेवली पाहिजे. आपल्याला राग येणे स्वाभाविक आहे, पण यंत्रणेबद्दल तसेच आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींविषयी बोलताना आपली संस्कृती आणि मर्यादा जपायला हव्यात. हीच आपली संस्कृती आहे. “सध्या ठाणेतील घोडबंदर रस्ता, कळवा, मुंब्रा, तसेच पूर्व आणि पश्चिमेकडील अनेक ठिकाणी गंभीर खड्ड्यांची माहिती नागरिक सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यामुळे नागरिक आणि कलाकार एकत्र येत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा ठरत आहे.