ठाणे : लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनाचा कलाकारांसह चाहत्यांनादेखील धक्का बसला आहे. अभिनेत्री प्रिया मराठे यांचे आज, वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.
प्रिया मराठे यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिने चार दिवस सासूचे, बडे अच्छे लगते है, पवित्र रिश्ता अशा गाजलेल्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिका विशेष गाजल्या होत्या. प्रत्येत सादरीकरणातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला. त्यांच्या निधनामुळे सपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकाल तसेच दिग्दर्शकांनी त्यांच्या सोशल मिडीयावर भावना व्यक्त केल्या आहेत.
दिग्दर्शक विजू माने यांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना विजू माने यांनी त्यांचा आणि प्रियाचा फोटो शेअर करत लिहिले , “A fairytale ends… ‘मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?’ हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे. सssssssर अशी मोठ्यान्ने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोहून जास्त वयाच्या ह्या पोरीला मी मनापासून ‘लेक’ मानलं होतं. बांदोडकर काॅलेजात एक माॅब प्ले केला होता. अ फेअरी टेल…प्रियाचं रंगभूमीवरलं पहिलं काम.
तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं. राजकन्या होती त्यात ती. तेच बोट धरून माझ्या आयुष्यात वावरली. माझ्या मुलीला मी सांगायचो, तुझ्याआधी मला एक मुलगी आहे बरं का… तिच्या आयुष्यातले खूप चढ उतार पाहिले. शंतनुसारखा गोड मुलगा तिला मिळाला. खूप बरं वाटलं होतं. गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया. बाबा मिस यू…बाबा लव्ह यू.” असे लिहीत दिग्दर्शक विजू माने यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या पोस्टरवर चाहत्यांनी कंमेट्स करीत प्रिया मराठेला श्रद्धांजली वाहिली आहे.