सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मीरा-भाईंदर महापालिकेने मीरा रोड येथे रात्र निवारा केंद्र सुरू केले. बेघरांना निवारा मिळावा हा यामागचा उद्देश होता. परंतु या केंद्रात व्यसनी आणि गैरप्रकार करणाऱ्यांनाच निवारा मिळत असल्याचे चित्र आहे. बंद असलेल्या या निवारा केंद्रासाठी महापालिकेने सुरक्षारक्षकही नेमला नसल्याने ही वास्तू भुरटय़ा चोरांनाही आंदण मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पदपथांवर राहणाऱ्यांसाठी ‘रात्र निवारा केंद्र’ ही योजना प्रत्येक महानगरपालिकांना राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेने शहरात पाच रात्र निवारा केंद्रे सुरू केली आणि त्याचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांकडे सोपवले. पदपथावर राहणाऱ्यांसाठी रात्रीचा निवारा व प्रातर्विधीसाठी अत्यंत माफक शुल्कात सेवा देण्याची ही योजना होती. मात्र कालांतराने या निवारा केंद्रात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही राहायला येत असल्याचे स्पष्ट झाल्यावर भाईंदर पश्चिमेकडील केंद्राचा अपवाद वगळता पाचपकी चार रात्र निवारा केंद्रे महानगरपालिकेने बंद केली. यात मीरा रोडच्या पूनम गार्डन परिसरातल्या या केंद्राचाही समावेश होता.
केंद्र बंद झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाचे केंद्राच्या इमारतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पूनम गार्डन परिसरातल्या या इमारतीत केवळ रात्र निवारा केंद्रच असल्याने या ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही. परिणामी इमारतीच्या आवारात मद्याच्या बाटल्या, इतर अनतिक वस्तू पडलेल्या दिसून येत आहे. इमारतीच्या खिडक्याही काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत. इमारतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याने भुरटय़ा चोरांनी खिडक्यांच्या लोखंडी जाळ्या तोडून आतील सामान चोरून नेले आहे.
रात्र निवारा केंद्राऐवजी आता शहरी बेघर निवारा केंद्र योजना सुरू झाली आहे.बंद झालेल्या रात्र निवारा केंद्रांच्या ठिकाणी शहर बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून महासभेच्या मान्यतेनंतर यासाठी सरकारकडून २५ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. पूनम गार्डन येथील केंद्राच्या इमारतीच्या सुरक्षेसाठी लवकरच रक्षक ठेवण्यात येईल.
– दीपाली पोवार, समाजविकास अधिकारी, महापालिका.
