Revenue department News : ठाणे : महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे हे उपस्थित होते. त्याच्या हस्ते कोकण विभागातील सात जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.खरगे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे एक महत्वाचे क्षेत्र असल्याचे सांगत त्यांनी महत्वाचा सल्ला दिला.

महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी पार पडलेल्या कार्यक्रमाला राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे हे उपस्थित होते. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर आयुक्त वैशाली इंदानी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, सह आयुक्त रवी पाटील, रविंद्र पवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, अमित सानप, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, व्याख्याते डॉ.दत्ता कोहिनकर, आदि मान्यवर उपस्थित होते.

महसूल दिनानिमित्त अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे यांच्या हस्ते कोकण विभागातील सात जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्पना साठे यांनी केले.

महसूल विभाग हा शासनाचा चेहरा

अपर मुख्य सचिव डॉ.विकास खारगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, ” समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे एक महत्वाचे क्षेत्र असून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे. महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे. महसूल विभागाने कोणती कामे केली आहेत आणि कोणती कामे करणार आहे, हे जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे. महसूल विभागाने लोकांसाठी अधिक जबाबदारीने, पारदर्शक आणि विश्वासार्हपणे काम केले पाहिजे. महाराष्ट्राचे नाव देशातच नाही तर जगामध्ये घेतले जाते. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक गुंतवणूक करीत आहेत. देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा १५ टक्के वाटा आहे. आपले राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे.

महसूल विभागावर जनतेचा विश्वास वाढेल

” तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात, जेणेकरुन जनतेला कुठूनही आपली कामे करता येतील. सर्व महसूल विभागात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर झाला पाहिजे. महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. लोकांची कामे गतिमानतेने होतील, महसूल विभागावर जनतेचा विश्वास वाढेल, राज्याची प्रगती होईल, अशी सेवा आपण सर्वांनी मिळून करायाची आहे,” असे आवाहनही डॉ. खरगे यांनी यावेळी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात दिवसांचा नव्हे तर संपूर्ण वर्षभर

महसूल विभाग इतर सर्व विभागांच्या समन्वयाने काम करतो. महसूल विभाग शासनाचे प्रतिनिधी आहे. लोकांना न्याय मिळेल अशी विश्वासार्हता निर्माण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे. महसूल सप्ताह हा केवळ सात दिवसांचा नसून संपूर्ण वर्षभर आपण लोकांना उत्तम दर्जाची सेवा दिली पाहिजे. लोकाभिमुख कामे करणारा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते, असे डॉ. खरगे यांनी यावेळी सांगितले.