कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतील २० वर्ष एकाच विभागात काम करणाऱ्या ठाणमांड्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासन करीत नाही. अनेक विभागात कर्मचारी, ठेकेदार यांच्या संगनमताने पालिकेच्या तिजोरीची वाटमारी सुरू आहे. पालिकेच्या ई प्रभागात फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत जुगार खेळत आहेत. वैद्यकीय आरोग्य विभागात काही ठराविक कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. या सर्व गैरकारभारी कर्मचाऱ्यांचे कारनामे उघड होऊनही प्रशासनातील वरिष्ठ या ‘गैरकारभारी’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने करदात्या नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालिकेच्या लेखा अभियांत्रिकी, मालमत्ता कर, आरोग्य, शिक्षण, नगररचना अशा ‘दुधाळ’ विभागात अनेक कर्मचारी १० ते २० वर्षापासून ठाण मांडून आहे. तीन वर्षातून कर्मचाऱ्यांची बदली होणे अपेक्षित असते. अनेक कर्मचारी राजकीय, नेते, मंत्री, मंत्रालयातून दबाव आणून आपली ‘दुधाळ’ विभागातून बदली होऊ देण्यास तयार नाहीत. ३० ते ४० कर्मचारी एकाच विभागात लिपिक ते अधीक्षक अशाप्रकारच्या बढत्या घेऊन एकाच विभागात कार्यरत असल्याचे चित्र आहे.
आयुक्त अभिनव गोयल यांनी अशा ठाणमांड्या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या बदल्यांच्या विचारात होते. हा विषय बारगळला. अशा ठाणमांड्या कर्मचाऱ्यांना न हटविता अतिरिक्त आयुक्त विभागाकडून किरकोळ बदल्या मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. सामान्य प्रशासन विभागाला डावलून हे प्रकार सुरू असल्याचे कर्मचाऱ्यांकडून समजते. काही कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रद्द करून त्यांना पुन्हा मूळ पदावर आणण्यात आले. या सोयीच्या प्रकारांमुळे गैरकारभार, लाचखोरी बोकाळत असल्याचे चित्र आहे.
पालिकेच्या ई प्रभागात काही दिवसापूर्वी फेरीवाला हटाव पथकातील कामगार कार्यालयीन वेळेत कार्यालया जवळील निवाऱ्यात जुगार खेळत होते. प्रशासनाने या कामगारांवर कारवाई केली नाही. आरोग्य विभागातील मुख्य औषध मिश्रक अनिल शिरपूरकर यांनी ऑफिस ऑफ प्राॅफिट नियमाचा भंग केला आहे. पालिका शाळांमधील आरोग्यवर्धिनी केंंद्रांवर लाखोची उधळपट्टी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. प्रशासनावर यावर मौन बाळगून आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठीचे सामान रुग्णांना आणावयास लावले जात आहे. रुग्णाला घरी सोडताना त्याच्याकडून पावती न देता पैसे उकळले जात आहेत. खासगी शाळांना शाळेतील स्वच्छतागृहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी घनकचरा विभागाचे आरोग्य निरीक्षक शैक्षणिक संस्था चालकांकडे एक हजार रूपयांची मागणी करत असल्याच्या तक्रारी आहेत. विवाह नोंदणी दाखले, रुग्णालय नोंदणी नुतनीकरण, बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर लावण्यासाठी पालिका कर्मचारी अडवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
या तक्रारींची वरिष्ठ प्रशासन दखल घेत नसल्याने मुख्यालय, प्रभागस्तरावरील कनिष्ठ कर्मचारी मोकाट सुटले आहेत. गुरूवारी एकाच दिवशी तीन अधिकारी लाच घेताना पकडले हे त्याचे दुष्परिणाम असल्याची टीका नागरिक करत आहेत. पालिका कर्मचारी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, प्रशासनाने बदली केली तर काही कर्मचारी राजकीय, मंत्रालय अशास्तरावरून दबाव आणून सोयीच्या बदल्या करून घेत आहेत. काही झालेल्या बदल्या रद्द करून घेत आहेत.
फेरीवाला हटाव पथकातील पत्ते खेळणाऱ्या कामगारांचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. कारवाई त्या स्तरावरून होईल.-तुषार सोनवणे, साहाय्य आयुक्त,