शाळेतील मित्र, शिक्षक, बाकावर कोरलेली नावे, मधल्या सुट्टीत मित्रांसोबत एकत्र खाल्लेला डब्बा, एकमेकांच्या काढलेल्या खोडय़ा..शाळेचे दिवस सरले तरीही त्या आठवणी मात्र मनाच्या कोपऱ्यात अजूनही जागा करून असतात. बरीच वर्षे उलटल्यानंतर आपले मित्र कसे दिसत असतील, कोठे असतील असे अनेक प्रश्न मनात असतात. पुन्हा एकदा शाळेचे दिवस अनुभवण्यासाठी शाळेच्या बाकावर बसून वर्गातील मज्जा लुटण्यासाठी कल्याण जोशी बाग येथील न्यू हायस्कूलचे माजी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. येत्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षण दिनी आपल्या शिक्षकांच्या उपस्थितीत या शाळेचे विद्यार्थी पुन्हा एकदा आठवणींचे धडे गिरवणार आहेत. शाळेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिक्षण दिनाला नेहमी विद्यार्थी वर्गात शिक्षक बनून मुलांना शिकवितात. परंतु माजी विद्यार्थी या दिवशी शाळेत आले आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरविले तर त्यापेक्षा वेगळा अनुभव काही असू शकत नाही, असे डॉ.चौधरी यांनी स्पष्ट केले. माजी शिक्षकांना, विद्यार्थ्यांना तसेच कर्मचारी, शिपाई वर्गालाही ते दिवस पुन्हा एकदा अनुभवता यावे म्हणून एक दिवसीय शाळेचे आयोजन केले आहे. ५ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता शाळेचे वर्ग भरणार आहेत. १० वर्षांपूर्वी दहावीतून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा एक अशा स्वरूपाची वर्गाची आखणी करण्यात आली आहे. तीन तासांच्या या शाळेत विद्यार्थी शिक्षकांसोबत आपल्या जुन्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा देण्याची संधी माजी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.प्रत्येकाच्या मनात शाळेत शिकविण्यात आलेली एक कविता तरी रेंगाळत असते. त्यावेळच्या कविता, त्यांच्या चाली या वेगळ्या होत्या. त्या चालींनी, मुलांच्या गजबजाटाने पुन्हा एकदा येथील वर्ग गजबजणार आहेत. विद्यार्थ्यांनी या दिवशी आपल्या शिक्षकांचे स्वागत करायचे आहे. शाळेच्या माजी मुख्याध्यापकही यावेळी उपस्थित राहणार आहेत. काही विद्यार्थी बाहेरगावी असून तेही येणार आहेत. शाळेचा गणवेशही ठरविण्यात आला असून सफेद कुर्ता व काळी पॅन्ट असा पेहराव करून हे विद्यार्थी शाळेत दाखल होणार आहेत. मंडळाचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांची ही कल्पना असून, यानिमित्ताने सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक पुन्हा एकदा एकत्र येतील. साधारण ३ ते ४ हजार विद्यार्थी या दिवशी शाळेत येण्याची शक्यता आहे. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी या दिवशी केली जाणार असल्याने माजी विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने या दिवशी उपस्थित राहावे असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेतील न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जोशी बाग ही शाळा यंदा आपला अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शाळेचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू हायस्कूल अमृत महोत्सव संपर्क समितीच्या कार्यवाह डॉ. वीणा चौधरी यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 75 year back school reunion
First published on: 27-08-2015 at 12:55 IST