कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील श्री बाल चिकित्सालयातील एका मराठी स्वागतिकेला रुग्णालयातच बेदम मारहाण करणाऱ्या बिहार प्रांतामधील परप्रांतीय गोकुळ झा या तरूणाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, तरूणीला मारहाण केल्यानंतर पोलिसांनी अटक करू नये आणि आपण कोणाला ओळखू येऊ नये म्हणून आरोपी गोकुळ झा याने आपली चेहरापट्टी, गणवेश बदलून आपली मूळ ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता.
गोकुळ झाला पोलीस कोठडी झाल्याने मानपाडा पोलीस त्याची रुग्णालयातील स्वागत कक्षातील तरूणीला मारहाण करण्याचा त्याचा उद्देश काय होता, या चौकशी बरोबर त्याच्या इतर गुन्ह्यांमधील सहभाग आणि तेथील गैरकृत्याची चौकशी करणार आहेत. गोकुळने तरूणीला केलेल्या मारहाण प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. गोकुळला बुधवारी सकाळी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते.
सोमवारी संध्याकाळी रुग्णालयात तरूणीला मारहाण केल्यानंतर गोकुळ झा तेथून पळून गेला होता. त्यानंतर तो त्याच्या घरी गेला नव्हता. तरूणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आणि या प्रकरणात एका परप्रांतीय तरूणाने एका मराठी तरूणीला मारहाण केल्याचा विषय पुढे आल्याने पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून गोकुळचा शोध सुरू केला होता. मनसेचे नेते अविनाश जाधव, माजी आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना मराठी तरूणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरूणाला स्वताहून शोधून काढा. त्याला भरपूर चोप द्या, मगच त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या, असे आदेश दिले होते. त्यामुळे मनसेचे स्थानिक, जिल्हा कार्यकर्ते कल्याण पूर्व भागात गोकुळ झाचा मंगळवारी संध्याकाळ शोध घेत होते.
दरम्यानच्या काळात पोलिसांनी गोकुळचा भाऊ रंजित झाला अधिक तपासासाठी ताब्यात घेतले होते. याशिवाय रुग्णालयात मारहाणीच्या वेेळी उपस्थित असलेल्या गोकुळचे नातेवाईक असलेल्या महिला, पुरूषांना ताब्यात घेतले होते. गोकुळचा पोलीस, मनसे कार्यकर्त्यांकडून शोध सुरू असताना मनसेचे काही कार्यकर्ते मंगळवारी रात्री मलंगगड रस्त्याने नेवाळी दिशेने वाहनाने चालले होते. त्यावेळी वाटेत त्यांना एक संशयास्पद तरूण दिसला. स्थानिकांनी हाच तो गोकुळ झा असल्याचे ओळखले. मनसे कार्यकर्त्यांनी गोकुळला पकडून त्याला भरपेट प्रसाद दिला. त्याला पकडून मानपाडा पोलीस ठाण्यात आणले.
चेहरापट्टी बदलली
आपण कोणास ओळखू नये म्हणून गोकुळने २४ तासाच्या कालावधीत एका केशकर्तनालयात जाऊन आपले केस कापून घेतले होते. दाढी काढली होती. गळ्यात सोनेरी माळ घातली होती. सदरा काढून त्या जागी टी शर्ट घातला होता. आता आपण कोणाला ओळखू शकत नाही या भ्रमात राहून गोकुळ झा गाफील राहून नेवाळी नाका भागातून पायी चालला होता. स्थानिकांनी त्याला ओळखताच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
कल्याण पूर्वेत अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीने गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी चेहरापट्टी बदलण्याची पध्दती अवलंबली होती.