* तीन दिवसांत विविध पदार्थाची मेजवानी * मासे, मटणावर मात्र फुली

येत्या शुक्रवारपासून डोंबिवलीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मंडप उभारला जात असतानाच या मांडवाखाली जमणाऱ्या मेळ्यातील साहित्यिकांच्या पोटपूजेचीही तयारी जोरात सुरू आहे. आर्थिक चणचणीमुळे संमेलनातील अनेक गोष्टींवर गंडांतर आले असले तरी भोजन आणि न्याहारीचा बेत मात्र पक्का झाला आहे. संमेलनातील पाहुण्यांना विविध प्रकारच्या भाज्या, ताक, श्रीखंड, गाजर हलवा, गुलाबजाम या पदार्थासोबतच आगरी पद्धतीने बनवलेल्या भाज्या आणि भाकरीवरही ताव मारता येणार आहे.

साहित्य संमेलनाच्या तयारीची लगबग शहरात सुरू असून विविध समित्या आपापले नेमून दिलेले काम चोखपणे करीत आहेत. संमेलनानिमित्त येणाऱ्या रसिक पाहुण्यांच्या पोटपूजेची चोख तयारी आयोजकांनी केली आहे. आगरी युथ फोरम या संस्थेकडे यंदाचे यजमानपद आल्याने साहित्य संमेलनामध्ये झिंगाडा, पापलेट खायला मिळणार अशी चर्चा रंगली होती. मात्र जेवण शुद्ध शाकाहारी स्वरूपाचे असेल, असे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगून टाकल्याने काही खवय्यांची निराशा झाली होती. मात्र साग्रसंगीत आगरी पद्धतीच्या भाज्या आणि भाकऱ्यांचा जेवणात समावेश करण्यात आला आहे.

संमेलनाचा मेन्यू

* सकाळी चहा, कॉफीसोबत कांदेपोहे, उपमा, शेव खोबरे, गोड शिरा अशी न्याहारी

* जेवणात पुरी, चपाती, फुलके, सोबत भाकरी

* छोलेमसाला, काजू तोंडली, भेंडी फ्राय, कोल्हापुरी मटकी उसळ, डाळिंबी उसळ, मूग शिराळी, व्हेज, कुरमा, फ्लॉवर मटार अशा भाज्यांचा बेत

* श्रीखंड, गाजर हलवा, मधुर मीलन, गुलाबजाम.

* ५दुपारच्या जेवणासोबत ग्रीन सॅलड आणि ताक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* भजी, बटाटा डोसा, तोंडी लावण्यासाठी लोणचे, पापड.