ठाणे – ठाणे महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते प्रकाश बर्डे यांनी अजित पवार गटाला अखेर रामराम करीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यानिमित्ताने महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांनी पक्ष उडी घेण्यास पुन्हा एकदा सुरुवात केल्याने शहरात निवडणुकीपूर्वी पक्षांतराचे वारे वाहू लागल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतराच्या वाऱ्यामुळे आगामी निवडणुकीत समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते प्रकाश बर्डे यांनी अजित पवार गटाला रामराम करीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रकाश बर्डे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन आदी उपस्थित होते.
प्रकाश बर्डे यांच्यासोबत उत्तर भारतीय सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष पंकज पांडे, बाळू चौगुले, सचिन हणुमंते, रमेश संकपाळ, अनिकेत शेलार, सनी कसबे, राकेश सिंग, विकेश यादव, संजय पवार, रामचंद्र यादव, सर्वेश कुमार, मीराज खान, शुभांगी बाबर, रेखा झा, नीलम विश्वकर्मा, मौशीना खान, मीरा पाठक, भाग्यश्री जाधव, सुमन मिश्रा आदींनीही प्रवेश केला. या प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाचे ठाण्यातील बळ वाढले असून अजित पवार गटाला झटका बसला आहे.
आज योग्य निर्णय घेतला
डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कित्येक वर्ष माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलेले पण काही काळ आमच्यापासून दूर गेलेले प्रकाश बर्डे आणि पंकज पांडे यांनी आज योग्य निर्णय घेतला आहे. हाडाच्या कार्यकर्त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो.”सर्वसमावेशक नेतृत्वावरच आम्हाला विश्वासप्रकाश बर्डे यांनी सांगितले की, “कळवा-मुंब्रा परिसराचा विकास डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालीच झाला आहे. दुर्लक्षित असलेल्या या भागाला त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वावरच आम्हाला विश्वास आहे.”