निमंत्रितांचे कवी संमेलन या साहित्य संमेलनातील अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मैफलीकडे डोंबिवलीकर रसिकांनी पाठ फिरवली. त्यामुळे रिकाम्या खुच्र्यापुढे कविता सादर करण्याची आफत महाराष्ट्रभरातून आलेल्या प्रतिभावंतांवर ओढवली.
उद्घाटन सोहळ्यानंतर संमेलन नगरीतील शं.ना.नवरे सभामंडपात आयोजित निमंत्रितांचे कवी संमेलन नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाले. सुरुवातीला तुरळक हा होईना मात्र रसिक होते. मात्र नंतर जसजशी रात्र होत गेली, तसा आधीच मूठभर असलेल्या रसिकांनीही काढता पाय घेतला. महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील तसेच गोवा, भोपाळ, बडोदा आदी ठिकाणांहून तब्बल ३० कवी या संमेलनात निमंत्रित करण्यात आले होते.
अनिल निरगुडकर यांनी जुळ्या मुली, सुलभा कोरे यांनी शोध, चित्रा क्षीरसागर यांनी केसांच्या बटा, मनीषा साधू यांनी ‘जनावर’ अशा विविध विषय आणि आशयांच्या कविता सादर केल्या.
मनोहर नरांजे यांनी नक्षलवादी भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांची व्यथा मांडणारी ‘वेदनेचा आदिमस्वर’ ही कविता सादर केली. एल. बी. पाटील यांनी आगरी भाषेतील ‘आमचे ते रागानं दिसलं बाई’ ही कविता सादर केली.
इंद्रजित घुले यांच्या ‘प्रेयसीच्या लग्नातील जेवण’ या कवितेला तरुणांनी विशेष दाद दिली. कवी अशोक बागवे यांनी सादर केलेल्या ‘नदीला म्हणावे नदीच्या किनारी’ या कवितेलाही प्रेक्षकांची पोचपावती मिळाली.
निमंत्रित कवींचे हे संमेलन दोन तास उशिरा सुरू झाल्याने रसिकांनी शेजारील कवी कट्टय़ावरील नवकवींच्या मैफलीचा आनंद घेतला. त्यामुळे निमंत्रितांना ऐकण्यासाठी मोजकेच रसिक उपस्थित होते. विशेष म्हणजे या कवी मंडळींनीही कविता ऐकल्यानंतर दुसऱ्याची कविता ऐकण्याचे सौजन्य दाखविले नाही.
‘प्रस्थापितांकडून नवोदितांची उपेक्षा’
सागर नरेकर, पु.भा.भावे संमेलन नगरी, डोंबिवली : प्रस्थापित साहित्यिक आत्मकेंद्री असून, नव्या लेखकांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. तो बदलून नवोदितांना पुढे आणण्यासाठी प्रस्थापितांनीच पुढाकार घ्यायला हवा, असा सूर नवोदित साहित्यिकांच्या चर्चेतून निघाला. ‘नवोदित लेखक : अपेक्षा आणि आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात अनेक नवोदितांनी आपली परखड मते मांडली.
सध्याच्या काळातील एकाही साहित्यिकाने नवोदितास पुढे आणले नाही, अशी खंत ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांनी व्यक्त केली. नवोदित साहित्यिकांच्या लेखनाला ज्येष्ठांची ही प्रतिसादशून्यता धोकादायक आहे, असेही ते म्हणाले. वृत्तपत्रे आणि प्रकाशकही नवोदितांना महत्त्व देत नसल्याची खंत या वेळी वक्त्यांनी व्यक्त केली.
नवोदित लेखकांनी आपली लेखनशैली कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कुणाच्या कौतुकाने हुरळून न जाता शैली सातत्यपूर्ण राखणे महत्त्वाचे आहे, असे मत रवी कोरडे यांनी व्यक्त केले. नवोदितांना अनेकदा लेखनासोबत उदरनिर्वाहाचा प्रश्नही येत असतो. अशा वेळी लेखन हे उदरनिर्वाहाचे साधन बनण्याची गरज मनस्विनी लता रवींद्र यांनी व्यक्त केले. तसेच नवोदितांनी समकालीन समाजही पाहायला हवा. जो विरोध नथुराम प्रवृत्तीला होतो, तोच ब्रिगेडी प्रवृत्तीलाही व्हावा असे मत प्रशांत आर्वे यांनी व्यक्त केले. नवोदितांच्या साहित्यात समाजाचे प्रश्न सोडवण्याची ताकद असावी असे मतही आर्वे यांनी व्यक्त केले. सचिन केतकर यांनीही या वेळी आपली भूमिका मांडली.