कल्याण – गेल्या आठवड्यात येथील योगीधाम आजमेरा हाईट्समध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना खडकपाडा पोलिसांनी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सरकार पक्षाची बाजू ऐकून शुक्ला यांच्यासह सात जणांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

याप्रकरणात शासनाच्या पर्यटन विकास महामंडळातील व्यवस्थापक अखिलेश शुक्ला, त्यांची पत्नी गीता, सुमित जाधव, दर्शन बोराडे असे एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आजमेरा सोसायटीत शुक्ला यांच्या शेजारी राहणाऱ्या लता कळवीकट्टे यांनी घरात धूप अगरबत्ती लावली होती. यावेळी शुक्ला यांनी या विषयावरून कळवीकुट्टे कुटुंबीयांशी वाद घालून, तुम्ही मराठी कुटुंबीय घाणेरडे असतात. मटणमांस खातात. तुमच्यासारखे मराठी लोक माझ्या समोर झाडू मारतात. मी मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आणेन तर तुमचे मराठी पण निघून जाईन, अशाप्रकारची वक्तव्ये करून मराठी कुटुंबीयांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – उल्हासनगरचे शासकीय रुग्णालय पुन्हा अंधारात, अतिदक्षता विभाग सोडून उर्वरित रुग्णालयात वीज नाही

मराठीचा विषय आल्याने शुक्ला यांचे दुसरे शेजारी धीरज देशमुख पुढे आले. त्यांनी शुक्ला यांना तुम्ही कळवीकुट्टे यांच्या बरोबरचा विषय सामंजस्याने मिटवा, पण सरसकट मराठी लोकांना बोलू नका, असे सुचविले. या सूचनेवरून अखिलेश शुक्ला यांनी धीरज देशमुख यांच्याशी वाद घातला. काही वेळाने शुक्ला यांनी बाहेरून आठ ते दहा जणांना बोलावून धीरज देशमुख, त्यांचा भाऊ अभिजित, लता कळवीकुट्टे कुटुंबीयांना मारहाण केली होती. मारेकऱ्यांच्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात अभिजित देशमुख जखमी झाले.

खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी धीरज देशमुख, अखिलेश शुक्ला यांनी परस्पर विरोधी तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. पोलिसांनी तत्परतेने मराठी कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या मारेकऱ्यांना अटक केली होती.

हेही वाचा – नवी मुंबईला अमली पदार्थांचा विळखा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वकिलावर रोष

शुक्रवारी कल्याण न्यायालयात शुक्ला यांच्यासह इतर मारेकऱ्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलीस कोठडीच्या विषयावर मारेकऱ्यांच्या एका समर्थकाने देशमुख यांचे वकील ॲड. हरिश सरोदे यांच्यावर डोळे मोठे करून रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच ॲड. सरोदे यांनी हे न्यायालय आहे असे आरोपीला सांगा. डोळे मोठे करायचे नाही. अन्यथा पोलीस ठाण्यात तक्रार करीन, असे शुक्ला समर्थकांना सुचविले. यावरून ॲड. सरोदे आणि समर्थक यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. शुक्ला समर्थकांनी हा विषय नाहक वाढविण्यात आला, असे सांगितले.