तात्पुरते परवाने बार, हॉटेलांतच मिळणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नववर्षांच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या मद्यपाटर्य़ामध्ये सहभागी होणाऱ्यांना ३१ डिसेंबरच्या दिवशी कोणत्याही परवानाधारक बार वा हॉटेलमध्येच तात्पुरता मद्य परवाना मिळणार आहे. याशिवाय मद्यप्राशनाचा कायमस्वरूपी परवाना अवघ्या एका दिवसात उपलब्ध करून देण्याची योजना उत्पादन शुल्क विभागाने आखली आहे.

मद्यप्राशन करणाऱ्याजवळ व्यक्तिगत परवाना नसल्यास तो गुन्हा ठरतो व असे मद्यपी कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात. मात्र बऱ्याचदा या नियमाची माहिती नसल्याने किंवा परवाना घेण्याची प्रक्रिया माहीत नसल्याने कोणीही असे परवाने घेत नाहीत. या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंबरच्या दिवशी सर्व बार किंवा हॉटेलमध्ये असे परवाने उपलब्ध करून दिले आहेत. देशी दारू पिण्यासाठी दोन रुपये, तर विदेशी दारू पिण्यासाठी पाच रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील हॉटेल तसेच बारमध्ये शुल्क भरल्यानंतर संबंधितांना तिथेच परवाने दिले जाणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ना. ना. पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून अशा स्वरूपाचे परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे दारू पिण्यासाठी कायमस्वरूपी परवाने दिले जात असून त्यासाठीही वर्षभराच्या परवान्याप्रमाणेच प्रक्रिया करावी लागते. मात्र त्यासाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागते, अशी माहिती अधीक्षक ना. ना. पाटील यांनी दिली.

परवाने असे मिळवा

*राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यप्राशनासाठी परवाने दिले जात असून त्यामध्ये तात्पुरता (एक दिवसासाठी), वर्षभर आणि  कायमस्वरूपी असे तीन प्रकारचे परवाने असतात.

*दारू पिण्यासाठी एक दिवसाचा परवाना मिळविण्यासाठी दोन ते पाच रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.

*हॉटेल किंवा बारमध्येच अशा स्वरूपाचे परवाने मिळतील.

*दारू पिण्यासाठी वर्षभराचा परवाना मिळविण्यासाठी संबंधितांना अर्ज करावा लागतो. अर्जासोबत वाहन परवान्याची छायांकित प्रत आणि  दोन छायाचित्रे द्यावी लागतात आणि शंभर रुपये शुल्क भरावे लागते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcohol drinking licence now get in a 24 hours
First published on: 30-12-2015 at 02:05 IST