अंबरनाथः शहरी बेघर नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी अंबरनाथ नगर परिषद सातत्याने सकारात्मक पावले उचलत आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत चालविण्यात येणाऱ्या पश्चिमेतील उलनचाळ येथील शहरी बेघर निवारा केंद्रात लाभार्थ्यांसाठी मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा ठाणे मानसिक रुग्णालय आणि हेल्प एज महाराष्ट्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. मार्गदर्शनासाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यशवंत सोळंकी, तसेच हेल्प एज महाराष्ट्र संस्थेचे प्रतिनिधी मीरांडा आणि कल्पेश वाकडे उपस्थित होते.
या सत्रात लाभार्थ्यांना मानसिक आजारांची लक्षणे, त्यांची कारणे आणि त्यावर उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. नैराश्य (Depression), चिंता (Anxiety), स्मृतिभ्रंश (Dementia) यांसारख्या विकारांची लक्षणे वेळेवर ओळखून त्यावर उपाय करणे किती गरजेचे आहे हे सांगण्यात आले. तज्ज्ञांनी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. “मन निरोगी तर तन निरोगी,” या भावनेतून लाभार्थ्यांना दैनंदिन जीवनात सकारात्मक विचार, नियमित दिनक्रम, सामाजिक संवाद आणि साध्या आनंददायी गोष्टींचा अवलंब करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले.
या मार्गदर्शनामुळे शहरी बेघर निवाऱ्यातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढला. “मानसिक आरोग्य हा दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग आहे. त्याची काळजी घेतल्यास आपण आपले जीवन अधिक सुखकर आणि समाधानकारक बनवू शकतो,” अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली. या सत्रास निवाऱ्याचे व्यवस्थापक, काळजीवाहक तसेच नगर परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत यापुढेही अशा उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
केंद्राचे यापूर्वीही कौतूक
अंबरनाथ पालिकेच्या या बेघर निवारा केंद्राचे यापूर्वीही कौतुक झाले आहे. अंबरनाथ नगरपरिषद अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शहरी बेघर निवाऱ्याची यशस्वी अंमलबजावणी सध्या राज्यभरात कौतुकास पात्र ठरत आहे. सध्या या निवाऱ्यात ३६ बेघर लाभार्थ्यांना मोफत निवास, जेवण व सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात येत असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
रस्त्यावर, रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या आणि कोणताही आधार नसलेल्या नागरिकांसाठी हा निवारा कायमस्वरूपी सुरू करण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या देखभालीसाठी व्यवस्थापक व काळजीवाहक कार्यरत असून, आरोग्य शिबिरे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ इत्यादी सुविधा देखील नियमितपणे दिल्या जात आहेत. या उपक्रमामुळे अंबरनाथमधील बेघर नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवनशैली प्राप्त झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्य नियंत्रण समितीने घेतली असून, महाराष्ट्रातील पाच सर्वोत्कृष्ट शहरी बेघर निवाऱ्यांमध्ये अंबरनाथची निवड करण्यात आली आहे. अंबरनाथ नगरपालिकेने स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रामुळे अनेक बेघरांना हक्काचा निवारा मिळाला आहे. नगरपालिका स्तरावर अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेले हा बेघर निवारा केंद्र राज्यात एक आदर्श केंद्र म्हणून पाहिले जाते.