नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लांबल्याने चर्चाना उधाण; सत्ताधारी शिवसेना अनुकूल
अंबरनाथ : कल्याण आणि डोंबिवली या शहरांप्रमाणेच अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची एकत्रित महापालिका करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांचा निवडणूकपूर्व कार्यक्रम २३ जानेवारी रोजी तातडीने स्थगित करण्यात आल्यानंतर अद्याप नव्याने कोणताही कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर महापालिका निर्मितीच्या शक्यतेला बळ मिळाले असून दोन्ही नगरपालिकांत सत्तेत असलेला शिवसेना पक्षही यासाठी सकारात्मक असल्याचे समजते.
अंबरनाथ नगरपालिका आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांची मुदत येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यामुळे ६ जानेवारी रोजी निवडणूकपूर्व कामांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला होता. २४ जानेवारी रोजी प्रभाग आरक्षणांची नोटीस जाहीर करून २७ जानेवारी रोजी प्रभाग आरक्षणासाठी सोडत होणार होती. मात्र त्याच वेळी एकसदस्यीय प्रभाग पद्धती आणि नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडीचा प्रस्तावास हिवाळी अधिवेशनात मंजुरी देण्यात आली असून त्याचे कायद्यात रूपांतर झाल्याने ही प्रक्रिया थांबविल्याचे बोलले जात होते. यापूर्वी बहुसदस्यीस प्रभाग पद्धतीनुसार कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाने २३ जानेवारी रोजी एका पत्राद्वारे तातडीने स्थगित केली होती. मात्र त्यानंतर नवी मुंबई महापालिकेची प्रभाग आरक्षण प्रक्रिया पार पडली असली तरी अंबरनाथ व बदलापूरच्या नगरपालिका निवडणुकांची प्रभाग आरक्षण प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नगरपालिकांची मिळून एकत्रित महापालिका तयार करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
एमएमआरडीएने यापूर्वीच या दोन्ही नगरपालिकांची एकत्रित महापालिका किंवा दोन्ही नगरपालिकांची स्वतंत्र महापालिका करण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी चार वर्षांपूर्वी कोकण विभागीय आयुक्तांनी या पालिकांची पाहणी करत अहवालही सादर केला होता. या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता असल्याने यापूर्वीचे भाजपप्रणीत सरकार महापालिका करणे टाळत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडीचे सरकार आल्याने दोन्ही शहरांच्या एकत्रित महापालिकेसाठी अनुकूल वातावरण आहे. महापालिकेची निर्मिती केल्यास येथे स्वबळावर शिवसेनेचा महापौर विराजमान होऊ शकतो. त्यामुळे हीच संधी साधत उपनगरातील सर्वात मोठय़ा नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहराची महापालिका स्थापन करून आपल्या ताब्यात ठेवण्याचा शिवसेनेच्या बडय़ा नेत्यांचा मानस असल्याचे समजते.
नगरपालिकांना अनेक मर्यादा
मोठय़ा प्रकल्पांच्या मंजुरीसाठी पालिकांना इतर कार्यालयांवर अवलंबून राहावे लागते. सध्याच्या घडीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, अद्ययावत अग्निशमन दल, नगररचनाकार आणि इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी दोन्ही नगरपालिका एकत्र आल्या आहेत. त्यामुळे महापालिका झाली तर या सर्वच अडचणी दूर होणार असल्याचे बोलले जात आहे.
दोन्ही शहरांच्या विकासासाठी महापालिका होणे गरजेचे आहे. महापालिकेच्या निर्मितीचे आम्ही यापूर्वीही स्वागत केले होते. तरी महापालिका झाल्यास आम्ही महापालिकेच्या निवडणुकीसाठीही सज्ज आहोत. दोन्ही शहरांत शिवसेनेचीच सत्ता असल्याने आमचाच महापौर होणार यात शंका नाही. – वामन म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख, बदलापूर.