अंबरनाथः अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना मंगळवारी घोषीत करण्यात आली. प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यावर सुनावणी झाल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचनेत काही किरकोळ बदल केले आहेत. त्यानंतर अखेर अंतिम प्रभार रचना जाहीर करण्यात आली. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात भाजपच्या वतीने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभाग रचनेला मंगळवारी अंतिम स्वरूप प्राप्त झाले. ऑगस्ट महिन्यात दोन्ही पालिकांनी या प्रारूप प्रभाग रचना जाहिर केल्या होत्या. त्यानंतर या प्रभाग रचनेवर सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. बदलापूर शहरात प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच त्यावरून राजकारण तापलेले पहायला मिळाले होते. आमदार किसन कथोरे यांनी या काळबेर असल्याचा आरोप केला होता. तर काही प्रभाग असे रचले जातील असा कयासही त्यांनी मांडला होता. त्यानंतर तशीच प्रभाग रचना झाल्याचा आरोपही कथोरे यांनी केला होता. त्यामुळे शहरात या प्रभाग रचनेबाबत चर्चांना उधाण आले होते.
अंबरनाथ शहरात एकूण १०२ हरकती उपस्थित करण्यात आल्या होत्या. तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात ८८ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यावर सुनावणी पार पडली. अखेर मंगळवारी दोन्ही पालिकांच्या अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या दोन्ही शहरांच्या प्रभाग रचनांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी प्रगणक गटाची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रभागातील लोकसंख्या घटली आहे तर काही प्रभागात संख्या वाढली आहे. काही प्रभागांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
अंबरनाथमध्ये ११ प्रभागात लोकसंख्या वाढ
अंबरनाथ पालिकेतील ११ प्रभागांमध्ये किरकोळ लोकसंख्या वाढ झाली आहे. यात प्रभाग क्रमाकं ३, ४, ८, ११, १९, २१. २३, २४, २५, २६ आणि २९ क्रमांकाच्या प्रभागात लोकसंख्या वाढली आहे. तर प्रभाग क्रमांक ७, १४, १६, १७, १८, २०, २७, २८ या प्रभागात लोकसंख्या कमी झाली आहे. प्रभाग क्रमांक १, २, ५, ६, ९, १०, १२, १३, १५ आणि २२ मध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत.
बदलापुरात प्रभाग सीमांमध्ये बदल
कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात पश्चिमेतील प्रभाग १, ३ आणि ४ मधील काही सीमा बदलण्यात आल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक १८ चा भाग २१मध्ये, प्रभाग क्रमांक १६ आणि १९ चा भाग १७ मध्ये जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १, २, ४, ५, ८, १२, १५, १६, २०, २१ आणि २३ ची लोकसंख्या वाढली आहे. तर प्रभाग क्रमांक ३, ६, ७, १३, १७, १८, १९, २२ या प्रभागात लोकसंख्या घटली आहे. तर प्रभाग क्रमांक ९, १०, ११, १४, २४ मध्ये स्थिती जैसे थे आहे.
