अंबरनाथ/बदलापूरः सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी मोठी गर्दी झाली होती. अंबरनाथ शहरात ५९ जागांसाठी तब्बल ४०० अर्ज तर थेट नगराध्यक्ष पदासाठी १४ अर्ज आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. त्याचवेळी कुळगाव बदलापूर नगरपालिकेसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी २१७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी उशिरापर्यंत दोन्ही पालिका मुख्यालयांमध्ये छाननी प्रक्रिया सुरू होती.
अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. त्यामुळे सकाळपासूनच दोन्ही पालिका मुख्यालयांमध्ये रांगा लागल्या होत्या. अंबरनाथ नगरपालिकेत तर शेवटच्या दिवशी उमेदवारांची मोठी धावपळ पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय पक्षांचे एबी फॉर्म मिळवण्यात प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांची धांदल उडाली.
पालिका मुख्यालयात प्रवेश मिळण्यापासून ते अर्ज दाखल करण्यापर्यंत उमेदवारांची धावाधाव पाहायला मिळाली होती. बदलापुरातही हीच परिस्थिती होती. गेल्या सात दिवसांपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशीच धाव घेतल्याने पालिका प्रशासनाचाही गोंधळ उडाला.
सोमवारी मध्यरात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आलेले अर्ज नोंदणी करण्याचे काम दोन्ही नगरपालिकांमध्ये सुरू होते. त्यामुळे किती अर्ज दाखल झाले, किती उमेदवारांनी किती अर्ज भरले याची माहिती थेट मंगळवारी दुपारनंतर उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्यालयात अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झाली.
सोमवारी उमेदवारांची उडालेली झुंबड आणि दाखल करण्यात आलेले अनेक अर्ज यामुळे मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत छाननीची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ अशा दोन्ही पालिकांची वैध उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उमेदवारांची धाकधुक कायम होती.
अंबरनाथ नगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५९ जागांसाठी एकूण ४०० अर्ज दाखल करण्यात आले होते. तर नगराध्यक्ष पदासाठी १४ अर्ज दाखल करण्यात आले होते. कुळगाव बदलापूर नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी १३० तर एकूण २१७ अर्ज दाखल करण्यात आले. त्यात नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) मनिषा वाळेकर, भाजपकडून तेजश्री करंजुले, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार ) पक्षाकडून अश्विनी पाटील, शिवसेना (ठाकरे गट) अंजली राऊत, कॉंग्रेसकडून नूतन प्रदिप पाटील या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर बदलापुरात भाजपकडून रूचिता घोरपडे, शिवसेनेकडून (शिंदे गट) वीणा म्हात्रे, आम आदमी पार्टीकडून आस्था मांजरेकर, शिवसेना ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, वंचित बहुजन आघाडीकडून रश्मी गवाणे यांनी तर मनसेच्या संगिता चेंदवणकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
