अंबरनाथ: अंबरनाथमध्ये एका पित्यानेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पश्चिमेतील शास्त्री नगर भागात ही घटना घडली. आनंद गणेशन असे आरोपीचे नाव असून आरोपी पत्नीपासून विभक्त राहत होता. बुधवारी रात्री मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह गोणीत पोत्यात भरून रेल्वे रुळाजवळच्या नाल्यात फेकला होता. नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीला पकडुन पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

कौटूंबिक वाद असल्याने आरोपी आनंद हा त्याची पत्नी आणि दोन मुलांपासून गेल्या काही वर्षांपासून विभक्त राहत होता. अनेकदा तो आपल्या मुलांना भेटण्यासाठी जात असायचा. बुधवारी आनंद त्याची पत्नी घरी नसताना १२ वर्षीय मुलगा आकाश याला न सांगताच आपल्या घरी घेऊन आला. मात्र त्यानंतर त्याने आकाशची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्दयपणे हत्या केली. या हत्येनंतर आनंदने मृतदेह एका गोणीत भरून रात्री पावणे बाराच्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेतील रेल्वे रुळाला लागून असलेल्या नाल्यात फेकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशय आल्याने काही नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता नाल्यात मृतदेह आढळला. आकाश याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी आनंद याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे. मात्र ही हत्या का केली याचे कारण कळू शकलेले नाही.