अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील जावसई परिसरातून अंबरनाथ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे त्याच्याकडून बेकायदेशीर अग्निशस्त्र आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जेम्स फ्रान्सिस असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गेल्या काही दिवसात अंबरनाथ शहरात विविध घटनांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या महिन्याभरात माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर अंबरनाथ पूर्वेतील बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाला होता. या दोन घटनांनंतर विविध गुन्हेगार, तडीपार यांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. या गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यासह बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्याबाबतही पोलिसांची यंत्रणा सक्रिय झाली होती.
याच पाहणीत अंबरनाथ पश्चिम भागातील जावसई येथील वाघवाडी भागात एक व्यक्ती बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी रात्री सापळा रचत वाघवाडी भागात जेम्स फ्रान्सिस याच्या घरावर छापा टाकला . यावेळी त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक बेकायदेशीर अग्निशस्त्र आणि तीन जिवंत काडतुसे आढळली. ते अग्निशस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे. तसेच या आरोपीवर आपल्याच नातेवाईकाच्या हत्येचा आरोपा असून त्यासह एकूण १७ गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आरोपीने हे अग्निशस्त्र नेमके कशासाठी आणले होते, ते विक्रीसाठी आणले होते का एखाद्या गुन्ह्यासाठी याचाही तपास पोलिस करत आहेत.