जाब विचारताच तात्पुरत्या उपाययोजना; इतर प्रश्न मात्र अनुत्तरितच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक महिन्यांपासून अंबरनाथच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात अस्वच्छता आणि असुविधांमुळे विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. याबाबतीत संस्थेच्या प्रशासनाला जाब विचारताच वसतिगृहाच्या स्वच्छतेकडे आणि प्रवेशद्वारावरील समस्यांकडे ताबडतोब लक्ष दिले. मात्र वसतिगृहाचे इतर प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत.

अंबरनाथ तालुक्यासह कल्याण, उल्हासनगर, शहापूर, भिवंडी आणि ठाणे भागांतूनही मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतात. कल्याण-बदलापूर मार्गावर असलेल्या या संस्थेच्या वसतिगृहात सध्या दीडशे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. नऊ  कोटी रुपये आणि चार वर्षांचा वेळ खर्ची घालत तयार झालेल्या या वसतिगृहात सध्या असमस्यांचा डोंगर उभा आहे. वसतिगृहाच्या प्रवेशद्वारापासूनच असुविधांची रांग सुरू होते. चिखलाने भरलेले प्रवेशद्वार, कचऱ्याचे ढीग आणि वसतिगृहातील आतील भागातही पाणी साचल्याने तिथे बिकट परिस्थिती होती. तसेच प्रवेशद्वारावरील दिवेही बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. आत साचलेल्या पाण्यामुळे आजारांनाही आमंत्रण मिळत असून अनेक विद्यार्थ्यांना डेंग्यू-मलेरिया या आजाराची लक्षणेही दिसून आली आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या बाहेर राहणेच पसंत केले आहे. मात्र याबाबत संस्था प्रशासनाला जाब विचारताच तात्काळ सूत्रे हलली आणि प्रवेशद्वारावरील दिवे, रस्त्यावर पाणी साचलेल्या ठिकाणी कच टाकून रस्ता सुरळीत करण्याच्या कामांना सुरुवात झाली. वसतिगृहातील आतील भागात असलेली अस्वच्छताही ताबडतोब काढण्यात आली, तसेच साचलेले पाणीही काढण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गेल्या काही महिन्यांपासूनचा प्रश्न मार्गी लागले.

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे फक्त दौरे

वसतिगृह आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील असुविधांच्या बाबतीत अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दौरे केले आहेत. मात्र त्या दौऱ्यांनंतर आश्वासनांशिवाय काहीही हाती लागले नाही. त्यामुळे या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांबाबतही विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath iti hostel bad facilities
First published on: 30-09-2016 at 01:26 IST